डरबन : २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम जवळपास निश्चित झाली आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं दिली आहे. चार नंबरवर कोण बॅटिंग करणार याबाबत अजूनही चाचपणी सुरु आहे. पण बाकीची टीम निश्चित असल्याचं कोहली म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या सीझनमध्ये भारतानं घरच्या मैदानात सर्वोत्तम प्रदर्शन केलं होतं. अशाच प्रकारचं प्रदर्शन इंग्लंडमध्ये होईलच असं नाही, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोहलीनं हे वक्तव्य केलं आहे.


२०१९चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. इंग्लंडमधलं वातावरण आणि खेळपट्ट्या एकदम वेगळ्या आहेत. घरच्या मैदानात ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली ते खेळाडू इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करतील हे निश्चित नाही. त्यामुळे कोणता खेळाडू या परिस्थितीमध्ये चांगला खेळेल ते पाहावं लागेल, असं कोहली म्हणालाय.


सध्याच्या भारताच्या वनडे टीमच्या संतुलनावरही विराट कोहली खुश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या भारतच युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन लेग स्पिनरना घेऊन खेळत आहे. गरज पडली तर आम्ही केदार जाधवचाही उपयोग करत आहोत. यामुळे भारतीय टीम संतुलित असल्याचा विश्वास कोहलीनं व्यक्त केला.