वेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?
Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी रचला होता इतिहास
जेव्हा क्रिकेट जगतात वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची एकतर्फी राजवट होती आणि चांगले फलंदाज त्यांच्या गोलंदाजीसमोर थरथर कापत असत तेव्हा ही गोष्ट घडली. पण, त्या काळातही भारतीय संघाने वेस्ट इंडिजला कडवी झुंज दिली. टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 97 धावांनी गमावला. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला 241 धावांवर रोखल्यानंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 402 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाला कसा तरी हा सामना ड्रॉ करण्यात यश आले. यानंतर तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाने फलंदाजी न करता 406 धावांचे लक्ष्य गाठून ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आणि यामुळे वेस्ट इंडिजचा तत्कालीन कर्णधार क्लाईव्ह लॉईड पूर्णपणे नाराज झाला होता.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची उत्कृष्ट फलंदाजी
21 एप्रिल 1976 रोजी सबिना पार्कवर सुरू झालेल्या शेवटच्या सामन्यात चार सामन्यांच्या मालिकेचा निर्णय होणार होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय फलंदाजांनी मागील सामन्यांप्रमाणेच पुन्हा एकदा शानदार सुरुवात केली. टीम इंडियाचे सलामीवीर सुनील गावस्कर आणि अंशुमन गायकवाड यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पहिल्या दिवशी एकही बळी घेता आला नाही आणि पहिल्या दिवशी टीम इंडियाने एक विकेट गमावून 175 धावा केल्या.
कॅरेबियन गोलंदाजांची दुसऱ्या दिवशी घाणेरडी खेळी
पहिल्या दिवशी भक्कम स्थितीत पोहोचल्यानंतर भारतीय फलंदाजांनीही चांगली सुरुवात केली आणि टीम इंडियाला 205 धावांवर दुसरा धक्का बसला. तेव्हा मोहिंदर अमरनाथ 39 धावांवर बाद झाला. यानंतर कॅरेबियन गोलंदाजांनी खोडसाळ खेळ केला. कर्णधार क्लाइव्ह लॉईडच्या संघाने धोकादायक रणनीती आखली. म्हणजेच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना जखमी करायला सुरुवात केली. यानंतर गुंडप्पा विश्वनाथ अवघ्या 8 धावा करून बाद झाला.
टीम इंडियाचे 3 खेळाडू हॉस्पिटलमध्ये
तीन विकेट्स गमावल्यानंतरही टीम इंडियाचे फलंदाज क्रीजवर उभे होते, पण त्यानंतर अंशुमन गायकवाडच्या डाव्या कानाला मार लागला आणि तो 81 धावा करून माघारी परतला. पुढचे 2 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये काढावे लागले. त्याचप्रमाणे मायकल होल्डिंगने ब्रिजेश पटेलच्या चेहऱ्याला दुखापत केली आणि तो 14 धावा करून परतला. ब्रिजेश पटेल यांची दुखापत इतकी खोल होती की त्यांच्या तोंडाला टाकेही घालावे लागले. तत्पूर्वी, 8 धावा करून बाद झालेला गुंडप्पा विश्वनाथही जखमी झाल्याने त्यालाही रुग्णालयात जावे लागले.
कर्णधार बिशनसिंग बेदीने डाव घोषित केला
क्लाईव्ह लॉयड अँड कंपनीरा रडीचा डाव पाहून टीम इंडियाचे तत्कालिन कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी आपल्या खेळाडूंना वाचवण्यासाठी येथेच डाव घोषित करणे चांगले मानले. टीम इंडियाने 306 धावांवर 6 गडी गमावून पहिला डाव घोषित केला. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 391 धावांत रोखले आणि पहिल्या डावाच्या आधारे 85 धावांनी पिछाडीवर पडली. दरम्यान, क्षेत्ररक्षणादरम्यान कॅप्टन बिशनसिंग बेदी आणि भागवत चंद्रशेखर यांनाही दुखापत झाली होती.
टीम इंडियाने दुसऱ्या डावात केवळ 97 धावा केल्या
अंशुमन गायकवाडच्या दुखापतीनंतर सुनील गावसकरने दिलीप वेंगसरकरसह टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली, मात्र गावस्कर काही चांगली खेळी करू शकले नाहीत.ते केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर दिलीप वेंगसरकरने मोहिंदर अमरनाथसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. 68 धावांच्या एकूण धावसंख्येवर 21 धावा करून दिलीप वेंगसरकर बाद झाले. यानंतर 97 धावांवर 8 धावा करून मदन लाल बाद झाले. यानंतर मोहिंदर अमरनाथ 97 धावांवर 60 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले, तर एस वेंकटराघवन यांना खातेही उघडता आले नाही.
टीम इंडियाचे हे 5 खेळाडू जखमी
97 धावांवर 5 विकेट पडल्यानंतर टीम इंडियाचे इतर खेळाडू मैदानात उतरू शकले नाहीत, कारण 5 खेळाडू जखमी झाले होते आणि ते फलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हते. यातील सलामीवीर अंशुमन गायकवाड, ब्रिजेश पटेल आणि गुंडप्पा विश्वनाथ हे फलंदाजी करताना जखमी झाले. त्याचवेळी क्षेत्ररक्षणादरम्यान कॅप्टन बिशनसिंग बेदी आणि भागवत चंद्रशेखर जखमी झाले. अशा प्रकारे टीम इंडियाचे 5 फलंदाज अनुपस्थित मानले गेले आणि टीम इंडिया 97 धावांवर ऑलआऊट झाली.
वेस्ट इंडिजने 13 धावांचे लक्ष्य सहज गाठले
टीम इंडिया 97 रन्सवर ऑलआऊट झाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला मॅच जिंकण्यासाठी फक्त 13 रन्सचं टार्गेट मिळाले, जे कॅरेबियन टीमनं अवघ्या 1.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अशाप्रकारे भारतीय क्रिकेट संघाने 10 विकेट्सने सामना गमावला आणि 4 सामन्यांची मालिका 1-2 ने गमावली.