मुंबई : टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या तीन दिवसांत श्रीलंकेचा पराभव केला. टीम इंडियाना हा खेळ 222 धावांच्या मोठ्या फरकाने आपल्या नावे केला. या एकतर्फी खेळामुळे इंडियन टीम आणि रोहित शर्माचे कौतुक होत आहे. आता रोहित शर्मा क्लिन स्वीप करण्यासाठी नवीन चाल खेळू शकतो. असे देखील बोलले जात आहे. आता टीम इंडियाला टी-20 मालिकेप्रमाणे कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करायला आवडेल. हे काम यशस्वी करण्यासाठी कर्णधार रोहित नवी चाल खेळू शकतो. ज्यासाठी तो एका धोकादायक गोलंदाजाला आपल्या संघात खेळ्याची संधी देऊ शकतो, ज्यामुळे श्रीलंका आणखी अडचणीत सापडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा कसोटी कर्णधार बनताच वर्षभरानंतर एका खेळाडूचे संघात पुनरागमन झाले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून संघाचा जादुई फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आहे. कुलदीप यादवचे प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला कुलदीप आता पुन्हा एकदा तिन्ही फॉरमॅटमध्ये परतला आहे.


2017 ते 2019 या काळात कुलदीपला संघाची ताकद मानली जात होती, पण त्यानंतर चांगला रेकॉर्ड असूनही या गोलंदाजाकडे दुर्लक्ष होऊ लागले.


श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी कुलदीप यादवचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याला मैदानात उतरवलं गेलं नाही. परंतु आता श्रीलंकेच्या अडचणी वाढवण्यासाठी आणि एकतर्फी सामना जिंकण्यासाठी रोहित त्याला मैदानात उतरवू शकतो, असे बोलले जात आहे.


कुलदीपने 13 फेब्रुवारी 2021 रोजी भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. कुलदीपची कसोटी कारकीर्द आतापर्यंत शांत होती. त्याने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यात 23 च्या सरासरीने 26 बळी घेतले आहेत.


पण आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे आणि हा खेळाडू पुन्हा प्लेइंग 11 मध्ये परतला, तर त्याची जादु पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळू शकते.


2019 विश्वचषकानंतर करिअरवर परिणाम


2019 च्या विश्वचषकानंतर निवड समितीने कुलदीप यादवकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. 2021 च्या टी20 विश्वचषकातही त्याला स्थान मिळाले नव्हते. त्यांच्या जागी रविचंद्र अश्विनला संधी मिळाली.


कुलदीपला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतही त्याचा समावेश केलेला नाही. अशा स्थितीत त्याच्या कारकिर्दीवर टांगती तलवार दिसली. मात्र कर्णधार रोहितने त्याला पुन्हा साथ दिली आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याला पुन्हा संधी दिली. आता कुलदीप रोहितच्या विश्वासावर खरा उतरतो की नाही हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.