राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
द्रविडच्या साधेपणाचे किस्से तुम्हीही यापूर्वी ऐकले असतील.
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड हे मोठं नाव समजलं जातं. सध्याच्या भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड यांना टीम इंडियाची वॉल म्हटलं जातं. इतकं मोठं नाव असूनही द्रविड यांनी साधेपणा सोडला नाही. द्रविड कुठेही बाहेर गेले तरीही सामान्य माणसाप्रमाणे सर्वांमध्ये वावरताना दिसतात. द्रविडच्या साधेपणाचे किस्से तुम्हीही यापूर्वी ऐकले असतील.
तर नुकताच राहुल द्रविडचा एक फोटो व्हायरल झाला असून हा फोटो बंगळूरूच्या एका पुस्तक कार्यक्रमातील आहे. यामध्ये राहुल द्रविड अगदी साधेपणाने शेवटच्या खुर्चीवर बसून पुस्तक चाळताना दिसतायत.
राहुल द्रविड यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर, एखादी व्यक्ती इतकी मोठी आणि फेमस असल्यानंतर इतका साधा कसा राहू शकतो, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू जी. विश्वनाथ त्यांच्या एका पुस्तकासंदर्भात बोलण्यासाठी आले होते. यादरम्यान राहुल द्रविड देखील तिथेच होता. मात्र यावेळी द्रविड सेलिब्रिटीसारखा नसून सामान्य माणसाप्रमाणे दिसत होता. तो मागच्या खुर्चीत शांत मास्क लावून बसलेला दिसत होता.
दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने राहुल द्रविड यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्यक्तीने सोशल मीडियावर म्हटलंय की, राहुल द्रविड कार्यक्रमाला आले होते. त्यांनी रामचंद्र गुहा यांच्याशी संवाद साधला. माझ्यासोबत असलेल्या मित्राने तो राहुल द्रविड असल्याचं सांगितलं. त्यानंतर राहुल द्रविड शांतपणे मागच्या खुर्चीवर जाऊन बसला.