कोलकाता : टीम इंडियाने बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये २-०ने मात दिली. या सीरिजची शेवटची मॅच ईडन गार्डनच्या मैदानात डे-नाईट खेळवण्यात आली. या मॅचनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काही खेळाडूंच्या आयपीएलमधल्या कामगिरीवर ठरवलं जाईल, असं शास्त्री म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी कधी खेळायला सुरुवात करतो आणि आयपीएलमध्ये कसा खेळतो? यावर सगळं अवलंबून आहे. तसंच दुसरे खेळाडू विकेटकीपिंगमध्ये काय करत आहेत आणि धोनीशी तुलना करताना त्यांचा फॉर्म कसा आहे, हेदेखील पाहावं लागेल. आयपीएल मोठी स्पर्धा आहे कारण तुमचे जवळपास १५ खेळाडू निश्चित झाले आहेत, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.


आयपीएल संपल्यानंतर टीम जवळपास निश्चित होईल. कोण कुठे आहे याबाबत चर्चा करण्यापेक्षा आयपीएलपर्यंत थांबा, यानंतरच तुम्ही निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असाल की सर्वोत्तम १७ खेळाडू कोण आहेत? असं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे.


रवी शास्त्रींचं हे वक्तव्य म्हणजे धोनीच्या आयपीएलमधल्या कामगिरीवर त्याचं भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जातंय. तसंच पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम निवडीसाठी आयपीएल महत्त्वाचं ठरेल, हेदेखील शास्त्रींनी स्पष्ट केलं आहे.