नवी दिल्ली : क्रिकेट मॅचमध्ये टॉस हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आधी बॅटिंग करायची की बॉलिंग हे पूर्णपणे टॉसवर अवलंबून असतं. मात्र, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या एकमेव टी-२० मॅचमध्ये एक अजबच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटमध्ये काळानुसार अनेक बदल घडले आहेत मात्र, टॉसची परंपरा अद्यापही आहे. मॅचमध्ये विजय किंवा पराभव हे सुद्धा अनेकदा टॉसवर अवलंबून असतं. प्रत्येक कॅप्टनला वाटतं असत की टॉस आपणच जिंकावा आणि त्यानंतर आपल्या निवडीनुसार बॅटींग किंवा बॉलिंग घ्यावी.


पीचचा अंदाज घेऊन कॅप्टन आपला निर्णय घेत असतो. जेणेकरुन त्याच्या टीमला सकारात्मक परिस्थितीत खेळता यावे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहली खूपच भाग्यशाली ठरल्याचं पहायला मिळालं.


बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या एकमेव टी-२० क्रिकेट मॅचमध्ये विराट कोहली टॉसच्या बाबतीत लकी ठरला नाही. मात्र, यावेळी कोहलीला त्याच्या नशिबाने नाही तर अंपायरच्या चुकीमुळे साथ दिली.


झालं असं की, टॉस उडविल्यानंतर अंपायरच्या एका चुकीमुळे हरलेला टॉस विराट कोहली जिंकला. या मॅचसाठी माजी क्रिकेटर मुरली कार्तिक टॉसचं प्रेझेंटेशन करत होता. तर, टॉस उडविताना कॅप्टन विराट कोहली आणि श्रीलंकन कॅप्टन उपुल थरंगा मैदानात उपस्थित होते. त्यानंतर टॉस उडवला आणि घडला अजब प्रकार.



श्रीलंकन टीमचा कॅप्टन थरंगा याने टॉस उडवला आणि विराटने म्हटलं 'हेड्स'. त्यानंतर टॉस खाली पडला. मग, टॉस पाहून मॅचच्या अंपायरने टेल्स म्हटलं. अंपायरने टेल्स म्हटलं खरं पण, होस्ट मुरली कार्तिकने हेड्स ऐकलं. मग, विराट कोहलीला विचारलं की आधी बॅटिंग करणार की बॉलिंग.


विराट कोहलीने आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, या दरम्यान मॅचचे अंपायर एंडी पेक्रॉफ्ट यांनी मुरली कार्तिक याला रोखण्याचा प्रयत्नही केला नाही. तसेच त्याची चुकी सुधारण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.