धक्कादायक वक्तव्य, ``टीम इंडियात २ गट, देशासाठी खेळताना एकोपा दिसत नाही``
विराट कोहलीच्या कर्णधारापदाच्या वादानंतर टीम इंडियातील अनेक वाद समोर आले आहेत. दरम्यान यातच आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे. टीम इंडियामध्ये फूट पडली असून टीममध्ये दोन गट पडल्याचं विधान शोएबने केलं आहे.
मुंबई : विराट कोहलीच्या कर्णधारापदाच्या वादानंतर टीम इंडियातील अनेक वाद समोर आले आहेत. दरम्यान यातच आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे. टीम इंडियामध्ये फूट पडली असून टीममध्ये दोन गट पडल्याचं विधान शोएबने केलं आहे.
शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, "या टीम इंडियामध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. टीम इंडियाचे खेळाडू देशासाठी एकत्र खेळत नाहीत."
टीम इंडियाबाबत धक्कादायक विधान
विराट कोहली कसोटी कर्णधारपद सोडणार याची आम्हाला आधीच माहिती होती, असा दावा शोएब अख्तरने केला आहे.
शोएब अख्तर म्हणाला की, विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाबद्दल काही भारतीय पत्रकारांनी मला माहिती दिली होती. विराट कोहली T20 कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि नंतर त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं.
टीममध्ये 2 गट पडले
शोएब अख्तर म्हणाला, "प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांनी उत्तम कामगिरी केली होती. मात्र आता शास्त्री आणि कोहली यांचा काळ संपला आहे. यानंतर टीममध्ये मोठी फूट आहे का? ते देशासाठी एकत्र खेळत नाहीत का? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं नाहीत. या टीममध्ये फूट पडली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी मॅनेजमेंट काय करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे."
माझ्या काही भारतीय पत्रकार मित्रांनी कोहलीसोबत काय होणार होतं त्याची मला कल्पना दिली. मला वाटलं की, तो कसोटी कर्णधार म्हणून कायम राहील, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणेच घडलं. मी नाव घेणार नाही, पण त्या पत्रकारांनी सांगितलेलं की, विराटला भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्यास भाग पाडलं जाऊ शकतं, असंही शोएब म्हणाला होता.