ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टेस्टसाठी भारतीय टीमची घोषणा
सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ जानेवारीला बॉर्डर गावस्कर सीरीजचा शेवटचा सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम या शेवटच्या सामन्यासाठी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पोहोचली आहे. शेवटची टेस्ट जिंकत भारतीय टीम पहिल्यांदा ही सिरीज आपल्या नावे करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. तर ऑस्ट्रेलियाची टीम हा सिरीज बरोबर करण्यासाठी मैदानात उतरेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर सीरीजमध्ये भारतीय टीमने 2-1 ने आघाडी घेतली आहे. बॉर्डर गावस्कर सीरीजच्या पहिल्या सामन्यात भारताने ३१ रनने विजय मिळवला होता. पर्थमध्ये झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने १४६ रनने जिंकला होता. मेलबर्नमध्ये झालेला तिसरा सामना भारताने १३७ रनने जिंकला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये सुरु होणाऱ्या चौथ्या टेस्टसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर १३ खेळाडूंची घोषणा केली आहे. अनफिट असलेला रविचंद्रन अश्विनला देखील या टीममध्ये जागा मिळाली आहे. पण प्लेइंग इलेवनमध्ये त्याला जागा मिळणार का हे पाहावं लागेल.
१३ सदस्यांच्या भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्याला जागा मिळालेली नाही. मेलबर्न टेस्टमध्ये चांगली कामगिरी करणारा इशांत शर्माला सिडनी टेस्टमध्ये आराम देण्यात आला आहे. त्याच्या जागी उमेश यादवची वापसी झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यादा कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.
सिडनी टेस्टसाठी भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.