मुंबई : रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या पदावरुन पायऊतार होताच नाराजी व्यक्त केली आहे. रवी शास्त्री यांनी 2019 च्या वर्ल्ड कपच्या संघ निवडीवरुन आक्षेप घेतला आहे. 2 वर्षांपूर्वी झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात एक नव्हे तब्बल 3 विकेटकीपर खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. याच मुद्द्यावर बोट ठेवून शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये एकूण 3 विकेटकीपर खेळवणं हे माझ्या समजण्यापलीकडचं होतं. कारण या स्पर्धेत अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता होती. (team india former coach ravi shastri is unhappy over to world cup 2019 team selection shreyas iyer ambati rayudu) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्री काय म्हणाले? 


"त्या टीम सिलेक्शनमध्ये माझी कोणतीच भूमिका नव्हती. पण, वर्ल्ड कपसाठी तब्बल 3 विकेटकीपर्सचा टीममध्ये समावेश करणं हे माझ्या समजण्यापलीकडचं होतं. तसेच या तिघांपैकी रायुडू किंवा श्रेयसला संधी मिळायला हवी होती", असं शास्त्री म्हणाले. ते टाईम्स ऑफ इंडियाशी बोलत होते  या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक अशा 3 विकेटकीपर खेळाडूंचा समावेश होता. 


टीम सिलेक्शनमध्ये हस्तक्षेप नाही 


"मी टीम सिलेक्शनमध्ये कधीच हस्तक्षेप केला नाही. जेव्हा जेव्हा माझी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच मी माझं मत मांडलं", असंही शास्त्रींनी नमूद केलं.


2019 वर्ल्ड कप संघात अंबाती रायुडूला स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्याच्याऐवजी विजय शंकरला संधी देण्यात आली होती. विजय शंकर हा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमधून थ्री डायमेन्शन अशी तिहेरी भूमिका बजावतो. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली, असं स्पष्टीकरण एमएसके प्रसाद यांनी केलं होतं.


यावरुन रायुडूने गंमतीत एक ट्विट केलं होतं. यामधून त्याने अप्रत्यक्ष एमएसके यांना टोला लगावला होता. 'मी वर्ल्ड कप पाहण्यासाठी नव्या 'थ्री डी' गॉगलची ऑर्डर दिलीय', असं ट्विट रायुडूने केलं होतं.


रायुडूला वर्ल्ड कप 2019 साठी 15 खेळाडूंमध्ये स्थान दिलं नाही. इतकंच काय, राखीव खेळाडूंमध्ये असूनही शिखर धवन आणि विजय शंकरच्याऐवजी रिषभ पंत आणि मयंक अग्रवालची निवड करण्यात आली.  यामुळे रायुडूने यानंतर क्रिकेटला रामराम ठोकला होता.