Team India Head Coach : टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असणार? याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियाचे (Team India) सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI) नव्या कोचची नियुक्ती केली जाणार आहे आणि यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. याची अंतिम तारीख 27 मे ठेवण्यात आली आहे. टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलैपासून सुरु होणार आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत स्टीफन फ्लेमिंग, रिकी पॉण्टिंग सारखअया परदेशी खेळाडूंचीही नावं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्गज खेळाडूचं नाव चर्चेत
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत दिग्गज भारतीय खेळाडूंचीही नावं आहेत. यात व्ही व्ही लक्ष्मण आणि गौतम गंभीर यांची नाव आहेत. विशेष म्हणजे राहुल द्रविडही पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करु शकतात. पण सध्या तरी यात गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नावाची जास्त शक्यता वर्तवली जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने गौतम गंभीरबरोबर चर्चाही सुरु केली आहे. 


गंभीर बनणार टीम इंडियाचा कोच?
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरला संधी मिळू शकते, याची दोन कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे गंभीरच्या मेंटॉरशीपखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी केलीय. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील प्ले ऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता हा पहिला संघ ठरला. आयपीएल पॉईंटटेबलमध्येही कोलकाता टॉपवर होता. कोलकाता नाईट रायडर्सला गंभीर जोडल्यानंतर संघाची कामगिरी उंचावली आहे. यामुळे बीसीसीआयचं गंभीर लक्ष वेधलं गेलंय.


दुसरं कारण म्हणजे IPL 2024 सुरु होण्यापूर्वी गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती घेतली. मोठ्या काळाता राजकारणापासून दूर राहाण्याचं गंभीरने ठरवलं आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठीच गंभीरने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.


साडे 3 वर्षांचा कार्यकाळ
भारताला दोन वर्ल्ड कप जिंकन देण्यात गौतम गंभीरने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर हा चांगला पर्याय ठरु शकतो. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ साडे तीन वर्षांचा असणार आहे आणि येत्या 1 जुलैपासून सुरु होणार आहे.


गौतम गंभीरची क्रिकेट कारकिर्द
गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 4154 धावा केल्या आहेत. तर कसोटीत 9 शतकं आणि 1 दुहेरी शतक त्याच्या नावावर आहे. तर 147 एकदिवसीय सामन्यात गंभीरने 5238 धावा केल्या असून यात 11 शतकं केलीत. 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप विजयात गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती.