`तोसुद्धा एक माणूस आहे, त्यालाही भावना आहेत....` हार्दिक पांड्यासोबत जे घडलं ते सांगताना भाऊ हुंदके देत रडला
Team India Hardik Pandya : कृणाल पांड्याला अश्रू अनावर... हार्दीकच्या आयुष्यात मागील 6 महिन्यांत आलेल्या वादळावर पहिल्यांदाच पडला उजेड...
Team India Hardik Pandya : टी20 विश्वचषकाच्या (T20wc) अंतिम सामन्यामध्ये अखेरची तीन षटकं भारतीय क्रिकेट संघासाठी 'करो या मरो' अशीच परिस्थिती निर्माण करून गेली. इथं संघाचा विजय कधीही निसटण्याच्या स्थितीत असताना हार्दीक पांड्यानं गोलंदाजी करत सामना खिशात टाकला आणि कोट्यवधी भारतीयांची मनं अवघ्या काही मिनिटांत जिंकली.
हार्दिकसाठी इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? अनेकांच्या मते हार्दिकला कमी वेळात बरीच प्रसिद्धी मिळाली. पण, जगासमोर सतत मुखवटा घेऊन वावरणारा हार्दिक मनातून पुरता खचला होता. मागील 6 महिन्यांपासून खासगी जीवनात येणाऱ्या वादळांमुळं तो हादरून गेला होता. ज्या क्रिकेटप्रेमींनी त्याच्यावर प्रेम केलं त्यांनीच त्याला निशाण्यावर घेतलं होतं. हार्दिक मात्र तरीही शांत होता.
टीम इंडियाच्या या खेळाडूच्या मनातील घालमेत त्यानं नव्हे, तर त्याच्या भावानं म्हणजेच क्रिकेटपटू (Krunal Pandya) कृणाल पांड्या यानं सर्वांसमोर आणली. हार्दिकनं नेमका स्वत:शीच कसा संघर्ष केला हे त्यानं शब्दांवाटे व्यक्त केलं आणि विश्वचषकातील त्याचं यश पाहून कृणालला त्याचा हा प्रवासच आठवला आणि त्याला हुंदका दाटून आला.
'तोसुद्धा एक माणूसच आहे....'
कृणालनं हार्दिकचं कौतुक करत लिहिलेल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं, 'हार्दिक आणि मी व्यावसायिक स्तरावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात करून आता एक दशक लोटलं. गेले काही दिवस हे जणू एखाद्या परिकथेसारखे होते. जणू काही प्रत्येक देशवासीय हे क्षण जगत होता. माझा भाऊ या साऱ्याच्या केंद्रस्थानी होता हे पाऊन मला भावना दाटून आल्या.
हेसुद्धा वाचा : 'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं
मागील 6 महिने त्याच्यासाठी अतिशय कठीण होते. त्याच्यासोबत जे काही घडलं ते त्याच्या वाट्याला यायला नाही पाहिजे होतं आणि भाऊ म्हणून मला त्याची खूप खंत वाटते. लोकांच्या हिणवण्यापासून त्याच्यावर होणाऱ्या अर्वाच्य टिकेपर्यंत सारंकाही घडलं. पण, तोसुद्धा एक माणूस आहे आणि त्यालाही भावना आहेत हेच आपण विसरलो. त्यानं या परिस्थितून हसऱ्या चेहऱ्यानं वाट काढली. पण हे सर्व किती कठीण होतं हे मला ठाऊक आहे. त्या क्षणापासून त्यानं प्रचंड मेहनत घेतली आणि विश्वचषकाच्या विजयासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. तेच त्याचं ध्येय्य होतं'.
हार्दिकच्या जीवनातील आव्हानात्मक काळाचा उल्लेख करताना त्याच्या मेहनतीचा आपल्याला हेवा वाटत असल्याची सुरेख प्रतिक्रिया कृणालनं दिली. आपल्या भावासाठी देश कायमच प्राधान्यस्थानी होता आणि कायम राहील असं म्हणत त्याचा आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो अशा शब्दांत त्यानं भावनांना वाट मोकळी करून दिली. इन्स्टाग्रामवरील या पोस्टमध्ये कृणालनं हार्दिकसोबतचे आपले काही फोटो शेअर करत गतकाळात डोकावूनही पाहिलं. त्याच्यासाठी हा मोठा क्षण होता... नाही का!