दुबई : T20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध करो या मरो या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा हट्टीपणा भारी पडला. मात्र कोणताही निर्णय संघासाठी कामी आला नाही. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा आणखी कठीण झाल्यात. या सामन्यात कोहलीने फलंदाजी क्रमवारीत तीन मोठे बदल केले. मात्र त्याने केलेल्या बदलांमुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला प्लेईंग-11 मध्ये संधी देण्यात आली होती आणि टॉसच्या वेळी कर्णधार कोहलीने ईशान टॉप ऑर्डरमध्ये खेळणार असल्याचं सांगितलं होतं. 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अनुभवी ईशानसोबत डावाची सुरुवात करण्याची जोखीम विराटने का घेतली, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 


सलामीवीर म्हणून रोहितकडे का दुर्लक्ष केलं गेलं?


रोहित शर्माकडे सलामीवीर म्हणून दुर्लक्ष करण्याचा विराटचा दुसरा धक्कादायक निर्णय होता. करो या मरो या सामन्यात रोहितच्या फलंदाजीचा क्रम बदलून इशान किशनला वरच्या फळीत ढकलण्या आलं. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला आणि तोही ईश सोधीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला. रोहितने 14 चेंडूत 14 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाच्या मधल्या फळीवर अधिक दबाव आला. 


सलामीवीर म्हणून रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने 113 पैकी 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्यात 2404 धावा केल्या आहेत. डावाची सुरुवात करताना रोहितने टी-20मध्ये 4 शतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत विराटचा हा निर्णयही समजण्यापलीकडचा होता.


रोहितऐवजी केएल राहुलला मिडल ऑर्डरमध्ये काढणं शक्य होतं


न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल अग्रस्थानी फलंदाजीला आला. तर रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. राहुलला मधल्या फळीत फलंदाजीचा चांगला अनुभव आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल या दोन्हीमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केली आहे.


चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केएल राहुलने 5 सामन्यात 87 च्या सरासरीने 174 धावा केल्या आहेत. त्याने नाबाद 110 धावांची खेळीही खेळली आहे. अशा परिस्थितीत कोहलीला फलंदाजीचा क्रम बदलावा लागला असता, तर राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवता आलं असतं आणि त्याच्या जागी रोहितला डावाची सुरुवात करता आली असती. फलंदाजीच्या क्रमात झालेल्या बदलामुळे कोहली स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तोही 9 धावा करून बाद झाला आणि टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावं लागलं.