मुंबई : आयपीएल स्पर्धा उरकल्यानंतर आता सर्वांना वर्ल्डकपचे वेध लागले आहे. प्रत्येक टीम वर्ल्डकपसाठी कसून सराव करत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. खेळाडू अनुभवी देखील आहेत. परंतु खेळाडूंना योग्य आणि निर्णायक वेळी कामगिरी करुन दाखवावी लागेल, असे भारताचे माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टीम इंडियाकडे निर्णायक कामगिरी करण्याची क्षमता आहे. आपल्याकडे चांगले खेळाडू आहेत, तसेच ते अनुभवी देखील आहेत. सामन्यात निर्णायक क्षणी त्यांना विजयी कामगिरी करावी लागेल. त्यांनी आतापर्यंत केलेली कामगिरी हा भूतकाळ आहे. ही नवी स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपल्याला आता नव्या पद्धतीने खेळावे लागणार आहे', असे देखील मोहिंदर अमरनाथ म्हणाले. 


वर्ल्डकप स्पर्धेला येत्या 30 मे पासून सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे. वर्ल्डकपमधील साखळी फेरीतील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जूनला होणार आहे.


हार्दिककडून अपेक्षा


'हार्दिक पांड्या प्रतिभावान खेळाडू आहे. पंरतु त्याला स्वत:ला वनडेमध्ये सिद्ध करावे लागेल. आयपीएलमुळे खेळाडूंचा सराव झाला आहे. परंतु आपण वर्ल्डकपची तुलना आयपीएल सोबत करु शकत नाही. आयपीएल हा वेगळा प्रकार आहे. ही वेगळया प्रकारची स्पर्धा आहे. हार्दिक पांड्या युवा खेळाडू आहे. तो अनुभवासह त्याच्या खेळाचा दर्जा आणखी सुधारत आहे', असा विश्वास अमरनाथ यांनी व्यक्त केला.


पांड्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर म्हणून सिद्ध करावे लागेल, की तो एक ऑलराऊंडर आहे की नाही. हार्दिक प्रतिभावान खेळाडू आहे. तो निर्णायक भूमिका बजावू शकतो. परंतु खेळाडूला परिस्थितीनुसार खेळावे लागते, असे देखील अमरनाथ म्हणाले.