मुंबई: विराट कोहलीनं वन डे आणि टी 20 पाठोपाठ आता कसोटीचंही कर्णधारपद सोडलं आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी सीरिज पराभूत झाल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडल्याचं ट्वीट करून सांगितलं आहे. आता पुढचा कर्णधार कोण? असा प्रश्न आहे. सध्या वन डे आणि टी 20 चं कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सीरिज खेळवली जाणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा कोहली मैदानात खेळताना दिसणार आहे. कोहली कर्णधारपदाच्या जबाबदारीतून बाहेर पडला आता तो केवळ आपल्या फलंदाजीवर फोकस करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


रोहित शर्मा कसोटी कर्णधार होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे मैदानापासून बाहेर आहे. कसोटीचं कर्णधारपद के एल राहुलकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. सध्या के एल राहुलचं नाव कर्णधारपदाच्या आघाडीवर आहे. 


अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा त्यांच्या करियरमध्ये सध्या वाईट फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही खेळाडूंचे संघातील स्थान डळमळीत झालं आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध (भारत विरुद्ध श्रीलंका) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांची निवड करणे कठीण आहे. श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि शुभमन गिल यांना कदाचित संधी मिळण्याची शक्यता आहे. 


प्रशिक्षक राहुल द्रविडच्या आगमनानंतर टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार बदलले आहेत. आता संघातही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून अनेक वरिष्ठ खेळाडूंची चाचणी घेतली जाणार आहे. ते अपयशी ठरल्यास पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात.