मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड होणार आहे. २ ऑक्टोबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची निवड करताना निवड समितीला रोहित शर्माला कुठे खेळवायचं? हा प्रश्न सतावू शकतो. वनडेमध्ये रोहित शर्माने मोठ्या खेळी केल्या आहेत, पण टेस्टमध्ये मात्र त्याला स्थान पक्कं करता आलं नाही. तर दुसरीकडे टेस्ट क्रिकेटमध्ये भारताची ओपनिंग बॅट्समनची समस्या कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी काहीच दिवसांपूर्वी रोहितचा टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनिंगसाठी विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. प्रसाद यांच्याआधी सौरव गांगुलीनेही रोहितला ओपनिंगला खेळवावं, असा सल्ला दिला होता.


रोहित शर्माने २७ टेस्ट मॅचमधये ३९.६२ च्या सरासरीने १,५८५ रन केले आहेत. यामध्ये ३ शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावर बॅटिंग केली, पण सहाव्या क्रमांकावर त्याची कामगिरी सर्वोत्तम झाली. या क्रमांकावर रोहितने १६ मॅचमध्ये ५४.५७ च्या सरासरीने १,०३७ रन केले. रोहितने तिसऱ्या क्रमांकावर ४ मॅचमध्ये १०७ रन, चौथ्या क्रमांकावर एक मॅचमध्ये ४ रन आणि पाचव्या क्रमांकावर ९ मॅचमध्ये ४३७ रन केले आहेत.


या आकडेवारीनुसार रोहितला सहाव्या क्रमांकावर संधी मिळाली पाहिजे, पण वेस्ट इंडिज दौऱ्यात हनुमा विहारीने उत्कृष्ट कामगिरी करुन सहावा क्रमांक आपल्या नावावर केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये हनुमा विहारने एक शतक आणि २ अर्धशतकं केली. बॅटिंगबरोबरच हनुमा विहारी ऑफ स्पिन बॉलिंगचाही पर्याय टीमला उपलब्ध करुन देतो.


रोहित शर्माने त्याची शेवटची टेस्ट मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळली. या मॅचमध्ये रोहितने ६३ नाबाद आणि ५ रन केले. पण मुलगी झाल्यामुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौरा सोडून आला. यानंतरच्या टेस्टमध्ये हनुमा विहारीला संधी मिळाली, आणि या संधीचं त्याने सोनं केलं.


भारतीय टीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट, पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे आणि सहाव्या क्रमांकावर हनुमा विहारीचं स्थान पक्कं आहे. त्यामुळे रोहितला टीममध्ये घ्यायचं असेल तर त्याला ओपनिंगला खेळावं लागू शकतं. त्यातच मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापासून भारताने ओपनिंगला वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली, पण कोणालाच फारशी चमक दाखवता आली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यात ओपनिंगला केएल राहुलला संधी देण्यात आली, पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही, त्यामुळे केएल राहुलऐवजी रोहितला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.


रोहित शर्माबरोबरच हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाचीही उत्सुकता आहे. वर्ल्ड कपनंतर दुखापतीमुळे हार्दिकला वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये हार्दिकची निवड झाली आहे, त्यामुळे टेस्टमध्येही हार्दिकची निवड होते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.