टीम इंडियाचा स्टार खेळाडू कमबॅकसाठी सज्ज, इंस्टाग्रामवर शेअर केला रनिंगचा व्हिडीओ
टीम इंडियाच्या या खेळाडूला इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापत झाली होती.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस कमबॅक करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. श्रेयसने इंस्टाग्रामवर रनिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस चढणीवर धावताना दिसतोय. श्रेयसने या व्हिडीओतून जोरदार कमबॅकचे संकेत दिले आहेत. श्रेयसने याआधी वर्कआऊट करतानाचा व्हिडीओही शेअर केला होता. श्रेयस गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. (team india star batsman shreyas iyer shared video of running in instagram)
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान दुखापत
श्रेयसला इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापत झाली होती. श्रेयसला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. यानंतर श्रेयसवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीमुळे श्रेयसला आयपीएलच्या 14 व्या मोसमातून माघार घ्यावी लागली होती. श्रेयस आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचे नेतृत्व करतो. पण तो दुखापतग्रस्त असल्याने रिषभ पंतला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.
श्रीलंका दौऱ्यासाठी संधी मिळणार?
टीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचे 2 संघ एकाच वेळी इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. अनुभवी खेळाडू हे लवकरच इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. श्रेयस या दुखापतीतून सावरल्यास त्याची या दौऱ्यासाठी निवड होऊ शकते. विशेष म्हणजे या दौऱ्यात श्रेयसला कॅप्टन्सी मिळण्याची शक्यता आहे.