पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्टला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पर्थमध्ये होणारा हा सामना नव्या ऑप्टिस स्टेडियमवर होणार आहे. आत्तापर्यंत या स्टेडियमवर दोन आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या असल्या तरी, ही पहिलीच टेस्ट असेल. एकही टेस्ट न झाल्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या पिचवर टॉस हा जुगार ठरू शकतो, अशात टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची का बॉलिंग, तसंच खेळपट्टी जलद असल्यामुळे किती फास्ट बॉलर टीममध्ये असावेत याचा निर्णय घेणं कर्णधारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिच क्युरेटरनी सांगितल्याप्रमाणे ही खेळपट्टी पर्थचं याआधीचं मैदान असलेल्या वाका प्रमाणेच जलद असेल. वाकाची खेळपट्टी ही जगातली सगळ्यात जलद खेळपट्टी मानली जाते. खेळपट्टीवरचं गवत पर्थमधली गरमी बघता खेळपट्टी तुटण्याची आणि भेगा पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशावेळी टॉस गमावून विरुद्ध कर्णधारालाच निर्णय घेऊन देणं योग्य ठरतं, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं केलं आहे.


खेळपट्टीवर असलेल्या गवतामुळे आपण खुश असल्याचं विराटनं एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं. गवत असल्यामुळे ही खेळपट्टी भारताच्या फास्ट बॉलरना आणखी मदत करेल. खेळपट्टीवरचं गवत बघून आम्ही घाबरलो नाही, तर रोमांचित झालो. या टेस्टमध्ये आणखी सकारात्मक मानसिकता घेऊन मैदानात उतरू असं विराट म्हणाला. पिच क्युरेटर खेळपट्टीवरचं गवत काढणार नाही, अशी अपेक्षाही विराटनं व्यक्त केली.


भारतापुढे आव्हान


ऍडलेडमधल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. पण ऍडलेडमधली खेळपट्टी आणि पर्थच्या खेळपट्टीमध्ये बराच फरक आहे. ऍडलेडमधली खेळपट्टी ही भारतीय टीमला साजेशी समजली जाते. पण पर्थची खेळपट्टी मात्र फास्ट बॉलरना अनुकूल आहे. मिचेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन आणि जॉस हेजलवूड हे ऑस्ट्रेलियाचं फास्ट बॉलरचं त्रिकूट सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं सगळ्यात भेदक समजलं जातं. त्यातच खेळपट्टीवर गवत असेल तर मात्र भारताला कडवी झुंज मिळू शकते.


भारतीय बॅट्समनचा फॉर्म


भारतीय बॅट्समनचा फॉर्म ही देखील कर्णधार विराट कोहलीसाठी चिंतेची बाब ठरू शकते. यावर्षी भारत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. यातल्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारताचा २-१नं आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर ४-१नं पराभव झाला. या दोन्ही सीरिजमध्ये विराट वगळता भारतीय बॅट्समननी निराशा केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही चेतेश्वर पुजारानं पहिल्या इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं. तर अजिंक्य रहाणेला दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक करण्यात यश आलं.


गेल्या काही परदेश दौऱ्यामध्ये भारताला ओपनिंग बॅट्समनच्या फॉर्मची समस्याही भेडसावत आहे. मुरली विजय आणि केएल राहुल यांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. या मॅचमध्ये ओपनरनी चांगली कामगिरी केली नाही तर मात्र पुन्हा एकदा पुजारा आणि विराटवर मॅचची भिस्त अवलंबून असेल.


डाव ऑस्ट्रेलियावर उलटणार?


याआधी भारतीय टीमला घाबरवण्यासाठी विरुद्ध टीम मुद्दामहून खेळपट्टीवर गवत ठेवायच्या. यावेळीही ऑस्ट्रेलियानं पर्थच्या खेळपट्टीवर गवत ठेवलं आहे. पण ऑस्ट्रेलियाचा हा डाव त्यांच्यावरही उलटू शकतो. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या फास्ट बॉलरनं सर्वोत्तम कामगिरी केली होती. भारतीय टीमचे सध्याचे फास्ट बॉलर हे आत्तापर्यंतच्या भारताच्या फास्ट बॉलरपेक्षा अधिक आक्रमक आणि भेदक असल्याचं मत अनेक दिग्गज क्रिकेपटूंनी व्यक्त केलं आहे. भारताचे हे फास्ट बॉलर हिरव्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील. त्यामुळे हिरवी खेळपट्टी देऊन ऑस्ट्रेलियानं मोठा जुगार खेळल्याचं बोललं जातंय.


दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीम


विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव