मुंबई : ज्या वयात इतरांना बॅट कशी धरायची हे माहित नसतं, त्या वयात मुंबईच्या या बर्थडे बॉयने कारनामा केला होता. या खेळाडूने वयाच्या 14 व्या वर्षी चक्क 2 दिवस बॅटिंग केली होती. या खेळीत 330 चेंडूंचा सामना केला होता. यात त्याने 85 चौकार आणि 5 खणखणीत सिक्सच्या मदतीने 546 धावा कुटल्या होत्या. कमी वयात अशी मोठी खेळी करणं नक्कीच 'खेळ' नाही,  किमान अशा मुलासाठी तरी ज्याने वयाच्या चौथ्या वर्षी आपल्या आईला गमावलं.
आईला गमावल्यानंतर या स्टार क्रिकेटरच्या वडिलांनी त्याचा सांभाळ केला. त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. टीम इंडियाचा (Team India) युवा सलामीवीर मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा आज (9 नोव्हेंबर) 22 वा वाढदिवस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीचा जन्म आजच्याच दिवशी महाराष्ट्रातील ठाण्यात झाला होता. पृथ्वी मुळचा बिहारचा, मात्र त्याच्या जन्माआधी त्याचे वडील महाराष्ट्रात आले होते. (team india younger star opener prithvi shaw today 9 november 22nd birthday know his cricket success story)


पृथ्वीचं लहाणपण आणि क्रिकेटची सुरुवात


पृथ्वीचं लहाणपण गेलं ते मुंबईनजीकच्या विरारमध्ये. पृथ्वीने वयाच्या तिसऱ्या वयापासून राहत्या घरात प्लास्टीक बॉलने खेळायची सुरुवात केली. पृथ्वीने क्रिकेट खेळता खेळता आधी घरातील टीव्ही, त्यानंतर लोकांच्या घरांच्या खिडक्या जे जे फोडता येईल, ते ते फोडलं. या दरम्यान पृथ्वीच्या वडिलांना त्याच्यात असलेलं क्रिकेटप्रती प्रेम जाणवलं. 


पृथ्वीला वांद्र्याच्या क्रिकेट एकेडमीत टाकलं. पृथ्वी दररोज विरार ते वांद्रे असा रेल्वने प्रवास करायचा. सकाळी लवकर वेळेत पोहचण्यासाठी पृथ्वीचे वडील सकाळी 4 वाजता पृथ्वीला उठवायचे. हाच असाच 'प्रवास' वर्षोंनवर्ष सुरु राहिला.


मोठ्या मनाचा 'बाप'माणूस


आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक बाप आपलं सर्वस्व पणाला लावतो. 


पृथ्वीच्या वडिलांचं कपड्यांचं दुकान होतं. मात्र पृथ्वीच्या करियरसाठी त्यांनी ते दुकानं विकून टाकलं. आपले वडील आपल्यासाठी काय करतायेत, याची पृथ्वीला जाणीव होती. ज्या वयात इतर मुलं कुटुंबिंयासोबत फिरातात, त्या वयात पृथ्वीचं विश्व हे क्रिकेटभोवती फिरत होतं. 


पृथ्वीच्या आयुष्यात अनेक चढ-ऊतार आले. आर्थिक सम्स्यांचा सामना केला. मात्र संघर्षासह पृथ्वीचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न आणखी मजबूत होत गेलं.


546 धावांची धमाकेदार खेळी


पृथ्वी पहिल्यांदा चमकला तो 2013 साली. पृथ्वीने हॅरिस शील्ड या स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्ड या शाळेचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत त्याने सेंट फ्रान्सिस शाळेविरुद्ध कारनामा केला. 


पृथ्वीने 330 चेंडूत 546 धावांची धमाकेदार खेळी केली. मुलाच्या या शानदार कामगिरीनंतरही पृथ्वीचे वडील नाराज होते. याबाबत स्वत: पृथ्वीनेच सांगितलं होतं. इतक्या मोठी खेळीनंतर नाबाद न परतल्याने वडील नाराज असल्याचं पृथ्वीने सांगितलं होतं.


पृथ्वीच्या नेतृत्वात टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजय 


पृथ्वीला 2016 मध्ये टीम इंडियाच्या अंडर 19 टीममध्ये संधी मिळाली. या टीमने श्रीलंकेत आशिया कप जिंकला होता. यानंतर 2 महिन्यांनी रणजीत पदार्पण केलं होतं. 


पृथ्वी पदार्पणातील सामना हा मुंबईकडून खेळला होता. या सेमी फायनल सामन्यात मुंबईसमोर तामिळनाडूचं आव्हान होतं. या सामन्यातील दुसऱ्या डावात पृथ्वीने शतकी खेळी केली. पृथ्वीच्या या खेळीमुळे मुंबईचा विजय झाला. 


पृथ्वीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर पृथ्वीसाठी आयपीएलचं द्वार खुले झाले. दिल्लीने पृथ्वीला 1 कोटी 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. यानंतर पृथ्वीने मागे पाहिलंच नाही. 


पृथ्वीचं स्वप्नवत कसोटी पदार्पण


टीम मॅनेजमेंटने 2018 मध्ये पृथ्वीला कसोटी पदार्पणाची संधी दिली. हा सामना वेस्टइंडिज विरुद्ध खेळवण्यात आला होता. या पदार्पणातील सामन्यात पृथ्वीने खणखणीत शतकं ठोकलं. यासह पृथ्वी कसोटी पदार्पणात सर्वात कमी वयात शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. तेव्हा पृथ्वीचं वय हे 18 वर्ष 329 दिवस इतकं होतं. सर्वात कमी वयात टीम इंडियाकडून शतक ठोकण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने वयाच्या 17 वर्ष 107 व्या दिवशी इंग्लंड विरुद्ध बॅट उंचावली होती.