मलप्पूरम : लाईव्ह मॅच सुरू असताना प्रेक्षकांच्या बसण्यासाठी व्यवस्था केलेली गॅलरीच खाली कोसळली. यासोबत लाईटसाठी उभे केलेले पोलही खाली कोसळले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भीषण दुर्घटनेत 200 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर केरळमधल्या  मलप्पूरम जिल्ह्यातील वंदूर इथे शनिवारी रात्री फुटबॉल सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी विशेष सुविधा तयार करण्यात आली होती. मात्र ही तात्पुरती उभी करण्यात आलेली प्रेक्षकांची गॅलरी कोसळून दुर्घटना घडली. 


या भीषण दुर्घटनेत 200 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना घडली तेव्हा तिथे 2 हजाहून अधिक लोक सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


प्राथमिक माहितीनुसार तिथे हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू होता. ज्यामुळे जमिनीमध्ये खड्डे करून उभे करण्यात आलेले खांब डळमळीत झाले आणि त्यामुळे ही गॅलरी कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.