मुंबई : बॉलिवूड... या झगमगणाऱ्या कलाविश्वाची कोणाला भुरळ पडली नाही असं होतच नाही. म्हणजे एखादा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडप्रती असणारं प्रेम आणि ओढ वाढतच जाते, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. असंख्य कलाकार, त्यांनी साकारलेल्या असंख्य कलाकृती या साऱ्याच्या बळावर बॉलिवूडचं अस्तित्व टिकून आहे. अशा या अनोख्या विश्वाविषयी कुतूहल  व्यक्त केलं आहे जागतिक स्तरावर अग्रस्थानी असणाऱ्या, अव्वल स्थानी असणाऱ्या टेनिसपटू रॉजर फेडरर याने. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रॉजर फेडररने नेटकरऱ्यांना / फॉलोअर्सना ट्विटरच्या माध्यमातून काही चित्रपटांची नावं सुचवण्यास सांगितलं. ज्यामध्ये त्याने बॉलिवूड चित्रपटांविषयीही विचारलं. अवघ्या काही तासांतच त्याच्या या ट्विटला अनेकांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये नेटकऱ्यांनी त्याला काही भन्नाट चित्रपट पाहण्याचे सल्ले दिले. 



एका चाहत्याने त्याला 'शोले', 'लगान', 'दंगल 'आणि 'जोधा अकबर' हे चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. या चाहत्याचे चक्क त्याने आभारही मानले. तर, आपण, आतापर्यंत ऑस्कर पुरस्कार विजेता 'स्लमडॉग मिलियनेयर' हा चित्रपटही पाहिला नसल्याचं त्याने कबुल केलं. 



'शोले' आणि 'लगान' पाहण्याचा सल्ला फेडररला अधिक फॉलोअर्सनी दिला. तर, काहींनी त्याला 'अमर प्रेम', 'रंग दे बसंती', '३ इडियट्स' हे चित्रपट पाहण्यासही सांगितलं. असंख्य युजर्सनी सुचवलेली चित्रपटांची नावं पाहता आता फेडरर यातून कोणते चित्रपट पाहतो आणि त्याचा त्याच्यावर काय परिणाम होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.