रोहित कर्णधार न होण्यामागे मोठं कारण....
रोहित शर्मा नवा कर्णधार होणार अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई : विराट कोहलीने टी-20चं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित शर्मा नवा कर्णधार होणार अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र यामध्ये एक कारण आहे ज्यामुळे हिटमॅन निराश होऊ शकतो. रोहित शर्माला भारताचं एकदिवसीय स्वरूपाचं कर्णधारपद मिळणं शक्य असल्याचं दिसत नाही.
रोहित शर्माला टी-20 चं कर्णधारपद मिळण्याचा मार्ग मोकळा आहे, पण त्याचे वय लक्षात घेता भारताच्या एकदिवसीय सामन्याचं कर्णधारपद मिळणं त्याच्यासाठी कठीण आहे. रोहित शर्मा सध्या 34 वर्षांचा आहे. त्यामुळे इतर युवा खेळाडू असताना एकदिवसीय टीमचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला क्वचितच संधी मिळेल.
जोपर्यंत विराट कोहलीचा प्रश्न आहे, तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत एकदिवसीय टीमचं कर्णधारपद भूषवू शकतो. 2023 चा एकदिवसीय विश्वचषक भारतातच खेळला जाईल आणि तो जिंकण्यासाठी विराट कोहली सर्वोत्तम प्रयत्न करेल.
कर्णधारपदासाठी रोहितचा वर्णी लागण्यास होईल उशीर
एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा नंबर येईपर्यंत तो 36 वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत बीसीसीआय रोहित शर्माला वयाच्या 36 व्या वर्षी वनडे कर्णधारपद देणार नाही. रोहित शर्मा टी -20 कर्णधार बनू शकतो, पण त्याच्यासाठी एकदिवसीय कर्णधार होणं कठीण आहे.
बीसीसीआय ऋषभ पंत आणि केएल राहुलचा करतंय विचार
विराट कोहलीला वयाच्या 27 व्या वर्षी कसोटीचं कर्णधारपद मिळालं. तर त्याला वयाच्या 29 व्या वर्षी वनडे आणि टी -20चं कर्णधारपद मिळालं. अशा स्थितीत ऋषभ पंत आणि केएल राहुल यांना नवीन कर्णधार म्हणून नेमण्याचा बीसीसीआयचा निर्णय असू शकतो.
जर भारताला नवीन कर्णधार बनवायचा असेल तर केएल राहुल हा एक चांगला पर्याय आहे. त्याने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्येही त्याची फलंदाजी खूप चांगली होती.