अंपायरने अपील नाकारलं तर राहुल चहरने केलं हे कृत्य; पहा व्हिडीयो
सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयामुळे राहुल चहर संतापला.
ब्लोमफॉन्टेन : भारत पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्या ठिकाणी 17 डिसेंबरपासून 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारताच्या या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 वनडे आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही समावेश आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारत अ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे.
राहुल चहर अंपायरवर भडकला
दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय सामन्यादरम्यान भारत अ संघाकडून खेळणारा लेगस्पिनर राहुल चहर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामन्यादरम्यान, अंपायरच्या निर्णयामुळे राहुल चहर संतापला आणि त्याने त्याचा चष्मा जमिनीवर फेकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल होतोय व्हिडीयो
ब्लोमफॉन्टेनमध्ये दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ यांच्यात सुरू असलेल्या चार दिवसीय सामन्यादरम्यान राहुल चहरचा अंपायरशी वाद झाला. दक्षिण आफ्रिका अ संघाच्या डावातील 128व्या ओव्हरमध्ये राहुल आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज सिंथेम्बा केशीलला गोलंदाजी करत होता. त्यावेळी केशील 56 धावांवर खेळत होता.
राहुलने केशिलविरुद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केलं. पण अंपायरने त्याचं अपील फेटाळलं यानंतर त्याने पुन्हा अपील केलं. अंपायरने पुन्हा अपील फेटाळलं, त्याचवेळी तो अंपायरशी वाद घालताना दिसला.
यादरम्यान राहुल चहरला इतका राग आला की त्याने त्याचा चष्मा जमिनीवर फेकला. राहुल चहरचे हे कृत्य त्याला चांगलेच महागात पडू शकते. राहुल चहरला अंपायरशी गैरवर्तन केल्याबद्दल मोठा दंडही होऊ शकतो.