आयपीएलमध्ये बोली न लागलेले दिग्गज ११ खेळाडू
आयपीएलच्या अकराव्या सिझनआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे.
मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सिझनआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे. या लिलावामध्ये नवोदित खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला तर काही दिग्गज खेळाडूंना जोरदार धक्का बसला. युवराज सिंगला किंग्ज इलेव्हन पंजाबनं बेस प्राईजवर म्हणजेच २ कोटी रुपयांना विकत घेतलं तर दिल्ली डेअरडेव्हिल्सनं गौतम गंभीरला २.८० कोटी रुपयांना विकत घेतलं. तर क्रिस गेलवर सुरुवातीला कोणत्याच टीमनं बोली लावली नाही. अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबनं गेलला विकत घेतलं.
एकीकडे गंभीर-युवराजसारख्या खेळाडूंना एवढ्या कमी किंमतीला विकत घेण्यात आलं. तर अनेक दिग्गज खेळाडूंवर कोणत्याच टीमनी बोली लावली नाही. या अकरा खेळाडूंवर एक नजर टाकूयात...
जो रूट
इंग्लंडचा कॅप्टन जो रुटलाही आयपीएलच्या कोणत्याच टीमनं लिलावात विकत घेतलं नाही.
हाशीम आमला
मागच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाला विकत घेण्यासाठी कोणत्याही आयपीएल टीमनं उत्साह दाखवला नाही.
शॉन मार्श
आयपीएलमध्ये शॉन मार्शनं किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. आयपीएलमधल्या कामगिरीनंतर लगेचच शॉन मार्शची ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीममध्ये निवड करण्यात आली. यावर्षी मात्र मार्शला कोणत्याही टीमनं विकत घेतलं नाही.
इओन मॉर्गन
इंग्लंडचा वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन इओन मॉर्गनलाही कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. याआधी मॉर्गन सनरायजर्स हैदराबादकडून खेळला होता.
कोरे अंडरसन
न्यूझीलंडचा स्फोटक बॅट्समन कोरे अंडरसनला विकत घेण्यासाठी कोणत्याच टीम उत्सूक नव्हत्या. कोरे अंडरसन याआधी मुंबई इंडियन्सकडून आणि त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल खेळला होता.
जॉनी बेअरस्टो
इंग्लंडचा विकेट कीपर जॉनी बेअरस्टोही आयपीएल लिलावामध्ये सहभागी झाला होता. पण कोणत्याच टीमनं त्याला विकत घेतलं नाही.
डेल स्टेन
सततच्या दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकेचा भेदक बॉलर डेल स्टेन वर्षभरापासून बाहेर आहे. याचाच फटका आयपीएल ऑक्शनवेळी स्टेनला बसला. कोणत्याच टीमनं स्टेनला विकत घेतलं नाही.
लसीथ मलिंगा
पहिल्या १० आयपीएलपैकी ३ आयपीएल मुंबई इंडियन्स जिंकली. या तिन्ही विजयांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं ते लसीथ मलिंगानं. पण यंदा मात्र मुंबई इंडियन्सनं मलिंगाला टीममध्ये कायम ठेवलं नाही. लिलावामध्येही मलिंगाला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.
जॉस हेझलवूड
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जॉस हेझलवूडला विकत घेण्यातही कोणत्याच टीमनं उत्साह दाखवला नाही.
ईश सोदी
आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये न्यूझीलंडचा स्पिनर इश सोदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण आयपीएल लिलावामध्ये मात्र त्याच्यावर कोणत्याच खेळाडूनं बोली लावली नाही.
इशांत शर्मा
भारतीय क्रिकेट टीममधला दिग्गज खेळाडू असलेल्या इशांत शर्मालाही कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.