मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावाआधी सगळ्या टीमनी काही खेळाडू रिटेन केले तर काहींना सोडून दिलं. लिलावाच्यावेळीही टीमनी राईट टू मॅच कार्डचा वापर करुन जुन्या खेळाडूंना पुन्हा विकत घेतलं. मागच्या वर्षी एका टीमकडून खेळलेले खेळाडू या मोसमामध्ये वेगळ्या टीममध्ये पाहायला मिळतील. आयपीएलच्या टीमनीही आता त्यांचे कॅप्टन निश्चित केले आहेत.


मुंबई इंडियन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सनं अपेक्षेप्रमाणेच रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं आहे. मुंबईनं रोहित शर्माला १५ कोटी रुपयांना रिटेन केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईनं ३ वेळा आयपीएल जिंकली.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू


आरसीबीनं कर्णधारपद विराट कोहलीकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विराटला एकदाही आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देता आलेली नाही. पण टीमला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.


किंग्ज इलेव्हन पंजाब


किंग्ज इलेव्हन पंजाबनं ऑफ स्पिनर आर.अश्विनला कॅप्टन बनवलं आहे. पंजाबनं अश्विनला ७.६ कोटी रुपयांना विकत घेतलं. यंदाच्या आयपीएलमध्ये अश्विन हा बॉलर असलेला एकमेव कॅप्टन आहे.


दिल्ली डेअरडेव्हिल्स


दिल्ली डेअरडेव्हिल्सनं गौतम गंभीरकडे टीमचं नेतृत्व सोपवलं आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून गंभीरकडे अनुभव आहे. याआधी गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईटरायडर्सनं दोनवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.


राजस्थान रॉयल्स


राजस्थान रॉयल्सनं स्टिव्ह स्मिथला रिटेन केलं होतं आणि आता त्याच्याकडेच कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. स्मिथनं मागच्या वर्षी रायजिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वात पुण्याच्या टीमनं फायनल गाठली होती.


चेन्नई सुपरकिंग्ज


चेन्नई सुपरकिंग्जनंही अपेक्षेप्रमाणेच महेंद्रसिंग धोनीला टीमचा कॅप्टन बनवलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं दोनवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.


सनरायजर्स हैदराबाद


सनरायजर्स हैदराबादनं डेव्हिड वॉर्नरकडे टीमचं नेतृत्व दिलं आहे. वॉर्नरनं नेहमीच आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे.


कोलकाता नाईटरायडर्स


आयपीएलमधल्या ७ टीमनी त्यांचे कॅप्टन घोषित केले असले तरी कोलकात्यानं मात्र अजून कर्णधाराचं नाव निश्चित केलंल नाही. लिलावावेळी कोलकात्यानं कोणत्याच कॅप्टनला विकत घेतलं नसल्याचं बोललं गेलं. त्यामुळे आता दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा किंवा क्रिस लिन यांच्यापैकी एकाला कर्णधार बनवण्याची शक्यता आहे.