आता फॅन्सना जुना विराट पहायला मिळणार, गावस्कर यांची भविष्यवाणी
कर्णधारपद सोडणं हे विराट कोहलीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे
मुंबई : अलीकडेच विराट कोहलीकडून वनडे टीमचं कर्णधारपद काढून घेण्यात आलंय. तर टी-20 टीमच्या कर्णधारपदाचाही यापूर्वी त्याने त्याग केला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विराटची बॅटही शांत आहे.
अशा परिस्थितीत आता विराटकडून मोठी खेळी पाहायला मिळेल, असा विश्वास माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला. विराटचे शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झालं होतं. विराट बऱ्याच दिवसांपासून आपल्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची वाट पाहतोय.
कर्णधारपद सोडणं हे विराट कोहलीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. एका वेबसाईटशी बोलताना त्यांनी सांगतिलं की, आता तुम्हाला दोन वर्षांपूर्वीचा विराट कोहली पाहायला मिळू शकतो, जो सलग शतकं करायचा.
गावस्कर म्हणाले, आता विराट कोहली वनडे आणि टी-20चं कर्णधार नसल्याने तो मोकळ्या मनाने आपल्या खेळाचा आनंद घेऊ शकेल.
विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकं झळकावली आहेत. विराटने 245 एकदिवसीय डावात 43 शतकं आणि कसोटी फॉर्मेटमध्ये 164 डावात 27 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीचं शेवटचं वनडे शतक 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होतं. ही मालिका 2019 च्या वर्ल्डकपनंतर लगेचच खेळली गेली.
माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही नवनिर्वाचित वनडे कर्णधार रोहित शर्माचंही कौतुक केलंय. गावस्कर म्हणाले की, माझा रोहित शर्मावर पूर्ण विश्वास आहे आणि तो त्याच्या आयपीएल संघ मुंबई इंडियन्सप्रमाणे भारतासाठी यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध होईल.
रोहित शर्माने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्ससाठी 5 आयपीएल विजेतेपद पटकावले आहेत.