अनुभवच सर्वकाही! शेवटच्या ओव्हरमध्ये रोहितने सूत्र हातात घेतली आणि....; हिटमॅनच्या निर्णयाने संपूर्ण गेमच पलटला
Rohit Sharma Last Over Field Placement: या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध टॉस जिंकून पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली.
Rohit Sharma Last Over Field Placement: मुंबई विरूद्ध पंजाब सामन्यामध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबईने बाजी मारली. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईच्या टीमने पंजाबचा 9 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यात एक वेळ अशी आली होती की, पंजाबचा विजय होईल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र अखेरच्या रनआऊटने संपूर्ण खेळाचं चित्र पालटलं.
या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध टॉस जिंकून पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवच्या 53 चेंडूंत 78 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईने सात विकेट्सवर 192 रन्स केले. यानंतर पंजाबचा डाव 19.1 ओव्हरमध्ये 183 रन्समध्ये गुंडाळला. मात्र सामन्यात मुंबईच्या टीमला जेव्हा गरज होती, तेव्हा माजी कर्णधार रोहित शर्मा धावून आला.
शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने केली कमाल
मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला 14 रन्सवर चार धक्के बसले होते. त्यानंतर पंजाब किंग्जला शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्यात मोठ्या पार्टनरशिपची आवश्यक होती. यावेळी आशुतोष आणि शशांक सिंग तुफान फलंदाजीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं होतं. शशांकने पाचव्या विकेटसाठी हरप्रीत सिंग (13) सोबत 28 चेंडूत 35 धावा, सहाव्या विकेटसाठी जितेश शर्मा (9) सोबत 15 चेंडूत 28 धावा आणि आशुतोषसोबत 17 चेंडूत 34 रन्स केले.
यामुळे सामन्याचं चित्र काहीसं पालटलं होतं. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. पंजाब किंग्जला शेवटच्या ओव्हरमध्ये 1 विकेट शिल्लक असताना विजयासाठी 12 रन्सची गरज होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकने गोलंदाजीची जबाबदारी आकाश मधवालकडे सोपवली. यावेळी रोहित शर्माने सूत्री हाती घेत फिल्डींग लावली.
यावेळी रोहित शर्माने मोहम्मद नबीला डीप कव्हरकडे फिल्डींगला पाठवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल वाईड घोषित करण्यात आला पण त्याच्या पुढच्याच बॉलवर रबाडाने डीप कव्हरवर उभ्या असलेल्या नबीकडे बॉल खेळला. यावेळी दुसरा रन घेण्याच्या नादात आणि नबीच्या उत्तम फिल्डींगमुळे मुंबई इंडियन्सला सामना जिंकता आला. अखेरीस रोहित शर्माची मदत घेणं टीमला फायद्याचं ठरताना दिसलं.