Indian Cricketer Playing Marble On Road: तुम्ही आतापर्यंत अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंना रस्त्यावर गल्ली क्रिकेट खेळताना पाहिलं असेल. अगदी सचिन तेंडुलकरपासून ते ए.बी. डिव्हिलीअर्सपर्यंत अनेकांचे असे गल्ली क्रिकेट खेळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकर जम्मू-काश्मीरमध्ये रस्त्यावर स्थानिकांवर क्रिकेट खेळताना दिसला. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये भारताचा एक क्रिकेटपटू लहान मुलांबरोबर चक्क गोट्या खेळताना दिसत आहे.


कोण आहे हा खेळाडू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगेबीरंगी बनियान, पांढऱ्या रंगाची थ्री फोर्थ आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून चेहऱ्यावर रुमाल बांधून हा खेळाडू रस्त्यावर गोट्या खेळता दिसतोय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मागील दीड वर्षापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला हा खेळाडू लवकरच पुन्हा मैदानावर पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रिमिअर लिगच्या आगामी पर्वामध्ये दिल्ली कॅपीटल्सचं नेतृत्व या खेळाडूकडे असणार आहे. बरोबर ओळखलं तुम्ही, आपण इथे बोलतोय ऋषभ पंतबद्दल. ऋषभ पंत आता पुन्हा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या आजारपणादरम्यान पंत अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि अपडेट्स पोस्ट करायचा. 


...म्हणून मुलांनी ओळखलं नाही


पंतने इन्स्टाग्रामवर स्टोरीमधून पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो त्याच्या घराच्या शेजारच्या गल्लीमध्ये चक्क गोट्या खेळता दिसतोय. बऱ्याच काळानंतर शेजारच्या गल्लीत गोट्या खेळलो, अशा अर्थाची कॅप्शन व्हिडीओवर लिहिलेली आहे. मात्र आपल्याबरोबर गोट्या खेळत असलेली व्यक्ती ऋषभ पंत आहे याची कल्पना व्हिडीओतील चिमुकल्यांना दिसत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे पंतने चेहऱ्यावर रुमाल बांधला आहे. तरी पंत या मुलांबरोबर गप्पा मारताना मारता गोट्या खेळता दिसतोय. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.



दिल्लीच्या संघाचे मालक म्हणाले, तो खेळणार आणि...


याच महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचे मालक पर्थ जिंदाल यांनी पंत आगामी आयपीएल खेळण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचं म्हटलं होतं. पंत संपूर्ण पर्व खेळणार असला तरी पहिल्या 7 सामन्यांमध्ये तो केवळ फलंदाज म्हणून खेळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. "ऋषभ फलंदाजी करतोय, धावण्याचा सराव करतो. त्याने विकेटकिपींगही सुरु केली आहे. तो यंदाच्या आयपीएलपर्यंत तंदरुस्त होईल, अशी माझी अपेक्षा आहे. तो पहिल्या सामन्यापासून संघाचं नेतृत्व करेल. मात्र पहिल्या सात सामन्यांमध्ये तो केवळ फलंदाज म्हणून खेळेल. त्याचं शरीर याला कसं प्रतिसाद देत आहे ते पाहून आम्ही पुढील निर्णय घेऊ," असं जिंदाल यांनी म्हटलं आहे. 


त्या अपघातानंतर मैदानापासून दूर


2022 साली डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यामध्ये उत्तराखंडमध्ये ऋषभ नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्वत:च्या घरी जाताना भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला. सुदैवाने पंतचा जीव वाचला. मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मागील सव्वा वर्षांहून अधिक काळ तो क्रिकेटपासून दूर आहे. आता त्याचं पुनरगामन कसं होतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.