मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जगातले आजी आणि माजी क्रिकेटपटू विराट कोहलीच्या प्रेमात आहेत. इंग्लंडचा क्रिकेटपटू जॉस बटलर यानेही विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. विराट कोहली हा सध्या जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे, असं जॉस बटलर म्हणाला आहे. एवढच नाही तर एक दिवस आपण विराट कोहलीच्या स्तरावर पोहोचू, असा विश्वासही बटलर याने व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत विराट कोहलीने वनडेमध्ये ४१ आणि टेस्टमध्ये २५ अशी एकूण ६६ शतकं लगावली आहेत. आंतरराष्ट्रीय शतकांच्याबाबतीत विराट हा सध्या फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.


विराटविषयी बोलताना बटलर म्हणाला, 'मला स्वत:च्या क्षमतेवर विश्वास आहे, मी एक दिवस विराटच्या स्तरावर जाईन. मला विराटसारखीच मानसिकता बनवायची आहे. तो प्रत्येक मॅचमध्ये शतक करण्यासाठी मैदानात उतरतो. कितीही रन केल्या तरी तो संतुष्ट होत नाही.'


बटलरनं असा दावा केला असला तरी विराटची बरोबरी करणं सध्या तरी मुश्किल दिसत आहे. कारण सध्या विराट कोहली हा तब्बल ६० च्या सरासरीने रन करत आहे.