World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये अक्षर पटेलची जागा घेणार `हा` खेळाडू; प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मोठा खुलासा
ICC ODI World Cup 2023: सोमवारी 22 तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजसाठी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल सामन्याला मुकला.
ICC ODI World Cup 2023: पुढच्या महिन्यात वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. नुकतंच टीम इंडियाने आशिया कप जिंकला असून सोमवारी 22 तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजसाठी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल सामन्याला मुकला. यावेळी त्याच्या जागी टीममध्ये वॉशिंग्टन सुंदरला स्थान देण्यात आलं. अशावेळी वर्ल्डकपमध्ये अक्षर पटेलची जागा कोण घेणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाचा स्पिनर रविचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे दुखापतीने त्रस्त असलेला अक्षर पटेल आयसीसीच्या मुदतीनुसार फिट झाला नाही, तर अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना वर्ल्डकपमध्ये स्थान मिळू शकते.
अश्विनचं वनडे टीममध्ये कमबॅक
अश्विनने शेवटचा वनडे सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. अक्षर पटेल आयसीसीने ठरवून दिलेल्या 28 सप्टेंबरच्या डेड लाईनपर्यंत फिट झाला नाही, तर अश्विनचा वर्ल्डकपसाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या आशिया कप दरम्यान अक्षर जखमी झाला होता. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यातही तो खेळू शकला नाही.
अजित आगरकर यांच्याकडून मोठी अपडेट
टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्माने सोमवारी संध्याकाळी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टीमची घोषणा केली. यावेळी आगरकर यांनी सांगितलं की, जर अक्षर योग्य वेळी फीट नसेल तर अश्विन किंवा सुंदरचा वर्ल्ड कपच्या टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो.
आगरकर म्हणाले, 'आमच्याकडे अश्विन आणि वॉशिंग्टनच्या यांच्या रूपाने दोन पर्याय आहेत. अक्षरच्या दुखापतीची प्रकृती जाणून घेतल्यानंतरच आम्ही निर्णय घेण्याचं ठरवलं. गरज पडल्यास आम्ही दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्याचा विचार करण्यात येईल.
रोहित शर्माचं मोठं विधान
आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या महिन्याच्या सुरुवातीला वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय टीमची निवड केलीये. त्यावेळी ऑफस्पिनरचा अश्विनचा समावेश न केल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आलं. दरम्यान सोमवारी टीमची घोषणा झाल्यानंतर कर्णधार रोहितला विचारण्यात आले की, जर अश्विन वर्ल्डकपत्या योजनेचा भाग होता, तर त्याला एशिया कपसाठी टीममध्ये का स्थान देण्यात आले नाही?
यावर रोहित शर्मा म्हणाला, अश्विनला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही आणि गरज पडल्यास त्याचा थेट टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अश्विनला भारताच्या वनडे टीममधून वगळण्यात आलं होतं. गेल्या वर्षी जानेवारीत आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या सिरीजसाठी तो साडेचार वर्षांनी वनडे टीममध्ये परतला होता, पण त्यानंतर त्याला पुन्हा वगळण्यात आलं.
कशी आहे ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडिया?
पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया:
केएल राहुल (C), रवींद्र जडेजा (VC), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (WK), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण
IND vs AUS च्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या, (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (WK), इशान किशन (WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.