This Player Withdrawal From IPL Due To Family Tragedy: इंग्लंडचा क्रिकेटपटू हॅरी ब्रूकने इंडियन प्रिमिअर लीगमधून माघार घेतली आहे. हॅरी ब्रूकने स्पर्धेमधून माघार घेण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे. यापूर्वी हॅरी ब्रूकने जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यातून खासगी कारण देत माघार घेतली होती. आता त्याने जानेवारीपासून तो सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमधून नाव का मागे घेत आहे याबद्दलचा खुलासा केला आहे. हॅरी ब्रूकने त्याच्या आजीचं निधन झाल्याने त्याने माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. मागील काही महिन्यांपासून हॅरीची आजी आजारी होती. माझ्या आजीकडे फार कमी वेळ शिल्लक होता त्यामुळेच मी तिच्या आजारपणात तिच्याबरोबर होतो, असं हॅरी ब्रूकने स्पष्ट केलं आहे.


नेमकं घडलंय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी हॅरी ब्रूकने आपण दिल्ली कॅपीटल्सकडून आयपीएलचं यंदाचं सीझन खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हॅरी ब्रूकला 4 कोटी रुपयांना दिल्लीच्या संघाने विकत घेतलं होतं. मात्र आता आपल्याला यंदाचं आयपीएल खेळता येणार नाही असं ब्रूकने सोशल मीडियावरुन जाहीर केलं आहे. "मी हे निश्चितपणे सांगू शकतो की मी आगामी आयपीएलमध्ये न खेळण्याचा फार कठीण  निर्णय मी घेतला आहे," असं हॅरी ब्रूकने म्हटलं आहे. "दिल्ली कॅपिटल्सने मला करारबद्ध केल्याने मी फार एक्सायटेड होतो. मी संघाबरोबर खेळण्यासाठी उत्सुक होतो," असं ब्रूकने नमूद केलं आहे. "मी का खेळणार नाही याचं खासगी कारण मी सांगायला नको. मात्र अनेकजण याबद्दल विचारणा करतील म्हणून मी हे कारण सांगण्याचा निर्णय घेतला आहे," असंही ब्रूकने नमूद केलं आङे.


अचानक माघार घेऊन मायदेशी परतला


"मागील महिन्यामध्ये माझ्या आजीचं निधन झालं. ती माझी फार मोठी पाठराखीण होती. माझ्या बालपणातील बरीच वर्ष मी तिच्या घरीच राहिलो. माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि माझं क्रिकेटबद्दलचं प्रेम हे तिच्याकडून आणि दिवंगत आजोबांकडून आलं आहे," असं हॅरी ब्रूकने स्पष्ट केलं आहे. यापूर्वी हॅरी ब्रूकने भारताविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली होती. तो युनायटेड अरब अमिरातीमधील ट्रेनिंग कॅम्पमधून थेट मायदेशी परतला होता. त्यावेळेस कारणाचा खुलासा करण्यात आला नव्हता. मात्र आता त्याने केलेल्या खुलाश्यानुसार आजी आजारी असल्याने आपण परत गेलो होतो असं सांगितलं आहे. 


कुटुंब आणि मानसिक शांती फार महत्त्वाची


"माझ्या आजीकडे फार वेळ नव्हता असं मला सांगण्यात आल्याने मी भारताविरुद्धची मालिका सोडून भारतात परतण्याच्या आधीच्या रात्री मायदेशी परतो. आता तिच्या निधनानंतर मी कुटुंबाबरोबर असणं फार गरजेचं आहे. मागील काही वर्षांमध्ये मी एक गोष्ट शिकलो आहे की मानसिक आरोग्य (शांतता) आणि माझं कुटुंब फार महत्त्वाचं आहे. माझं कुटुंब सोडून इतर कोणतीही गोष्ट फार महत्त्वाची नाही," असं हॅरी ब्रूक म्हणाला.



दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा पहिला सामना 23 मार्च रोजी होणार आहे. दिल्ली पंजाब किंग्सच्या संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. दिल्लीच्या संघाने अद्याप हॅरी ब्रूकच्या जागी कोणता खेळाडू खेळणार हे जाहीर केलेलं नाही.