Vinesh Phogat Coach : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं संपूर्ण देशातून कौतुक होत असतानाच अनेकांच्याच मनाला रुखरुख लागलीये ती म्हणजे विनेश फोगाटसोबत घडलेल्या एका प्रसंगाची. अंतिम सामन्याआधीच विनेश 50 किलो वजनी गटासाठीच्या वजन प्रमाण निकषांमध्ये न बसल्यामुळं तिला या स्पर्धेतून बाद करण्यात आलं. थेट सुवर्णपदाकाला गवसणी घालण्यासाठी सज्ज असणाऱ्या विनेशची स्वप्न एका क्षणात विरली. असंख्य प्रयत्न करूनही विनेशला अपयशाचा सामना करावा लागला आणि तिच्या संपूर्ण टीमचाही स्वप्नभंग झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्याआधी नेमकं काय घडलं होतं, विनेशची मानसिक आणि शारीरिक स्थिती नेमकी कशी होती यासंदर्भात आता तिचे प्रशिक्षक (Woller Akos) वोलर अकोस यांनीच स्वत: सविस्तर माहिती दिली आहे. वोलर यांनी केलेलं वर्णन पाहता विनेशला झालेल्या यातना आणि तिच्यापुढील अडचणींची जाणीव यामुळं सर्वांनाच झाली. विनेशनं इतक्या जिद्दीनं वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न केले, की एका क्षणी तिचा जीव जाईल... याच भीतीनं तिच्या प्रशिक्षकांनाही धास्ती लागून राहिली. 


काय म्हणाले विनेशचे प्रशिक्षक? पाहा जसंच्या तसं... 


50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळं अंतिम फेरीला मुकलेल्या विनेशच्या प्रशिक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'त्या' रात्री नेमकं काय घडलं, अंतिम सामन्याआधी विनेशनं किती संघर्ष केला याची माहिती दिली. अकोस यांनी लिहिलं, 'टीमनं शक्य ते सर्व प्रयत्न केले... उपांत्य फेरीनंतर 2.7 किलोग्रॅम इतकं वजन कमी करणं अपेक्षित होतं. साधारण एक तास 20 मिनिटांसाठी आम्ही व्यायाम केला पण, तरीही 1.5 किलो वजन कमी करणं शिल्लक होतं. पुढं 50 मिनिचं सॉना घेतला. पण घामाचा एक थेंबही तिच्यावर दिसला नाही. आता पर्यायच नव्हता. मध्यरात्रीपासून पहाटे 5.30 वाजेपर्यंत तिनं विविध कार्डिओ यंत्रा आणि इतर उपकरणांचा आधार घेत व्यायाम केला. पाऊण पाऊण तासाच्या तुकड्यांमध्ये अवघ्या दोन ते तीम मिनिटांच्या विश्रांतीनं ती व्यायाम करत राहिली. ती कोसळली पण, कशीबशी पुन्हा सावरली. मी सहसा असं काही वर्णनात्मक लिहीत नाही पण मला इतकंच आठवतंय ही मी हाच विचार करत होतो, हे असं सुरू राहिलं तर हिचा जीव जाईल....'. 


स्पर्धेतून बाद झाल्याचं वृत्त कळताच विनेशच्या अश्रूंचा बांध फुटेल असं आम्हाला वाटलं होतं. पण, तिनं अतिशय धीरानं या प्रसंगाचा सामना केला. रुग्णालयातून माघारी येत असताना विनेशनंच आपणा सर्वांना उदास होण्याचं कारण नाही असं सांगत प्रशिक्षकांनीच तिला दिलेली शिकवण पुन्हा त्यांना आठवून दिली. जगातील सर्वात यशस्वी कुस्तीपटूला नमवत आपली पात्रता आपण सिद्ध केल्याचं अकोस यांनी विनेशला सांगितलं होतं आणि याच धीरामुळं ती या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देऊ शकली.