केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे ३ खेळाडू माघारी परतणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ही माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट हे तीन खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. बॉलशी छेडछाड करण्यामध्ये या तिघांचाच समावेश होता. अन्य कोणताही खेळाडू किंवा प्रशिक्षकाला याबाबत कल्पना नव्हती, असं सदरलँड यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन त्याच्या पदावर कायम राहणार आहे.


२४ तासांमध्ये चौकशी पूर्ण होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकराणाची चौकशी २४ तासांमध्ये पूर्ण होईल आणि यानंतर दोषी खेळाडूंवर कारवाई केली जाईल, असं वक्तव्य सदरलँड यांनी केलं आहे. वॉर्नर आणि स्मिथचं एका वर्षासाठी निलंबन होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण याबाबत चौकशीनंतरच निर्णय होईल.


आयपीएल भवितव्यही धोक्यात


क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कारवाई केल्यानंतर या दोघांच्या आयपीएलमधल्या भवितव्याबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली होती.


स्टीव्ह स्मिथ हा राजस्थान रॉयल्सकडून तर डेव्हि़ड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. बॉल छेडछाड प्रकरण समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हायला लागलं होतं. त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार आहे. त्यामुळे आता वॉर्नरवरही कारवाई झाली तर हैदराबादला नवा कॅप्टन शोधावा लागेल. वॉर्नरऐवजी शिखर धवनकडे टीमचं नेतृत्व जाऊ शकतं. राजस्थान आणि हैदराबाद एकमेकांविरुद्धच त्यांची पहिली मॅच ९ एप्रिला खेळणार आहेत.


स्मिथची कबुली


ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.


अशी झाली बॉलशी छेडछाड


दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.


बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.