सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं भारताचा कर्णधार विराट कोहलीला इशारा दिला आहे. गरज पडली तर आम्ही विराट कोहलीला निशाणा बनवायला मागे-पुढे बघणार नाही, असं टीम पेन म्हणाला आहे. विराट कोहलीसमोर अडचण निर्माण करण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाच्या बॉलरमध्ये आहे, असं वक्तव्य पेननं केलं. ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरनी भावनिक होऊ नये असं आवाहनही टीम पेननं केलं. जर आमच्या फास्ट बॉलरनी क्षमतेप्रमाणे कामगिरी केली तर आम्ही निश्चितच विराटपुढे अडचण निर्माण करू शकू, अशी प्रतिक्रिया टीम पेननं दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी कधी आपण भावूक होतो आणि रस्ता चुकतो. अशीही वेळ येईल जेव्हा ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर वादळी बॉलिंग करत असतील तेव्हा त्यांना धैर्य कायम ठेवावं लागेल, असा सल्ला टीम पेननं दिला.


विराट कोहली याआधीही दोन वेळा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊन आला आहे. नेहमीच मैदानात आक्रमक असलेल्या विराट कोहलीनं यावेळी आम्ही स्लेजिंगला सुरुवात करणार नाही पण ऑस्ट्रेलियानं सुरु केलं तर त्याला प्रत्युत्तर देऊ असा पवित्रा घेतला आहे.


तर टीम पेननंही गरज पडल्यास आम्ही विराट कोहलीवर निशाणा साधू. विराट अशी व्यक्ती आहे ज्याला अशा पद्धतीनं क्रिकेट खेळणं आवडतं, असं टीम पेन म्हणाला.


जर मैदानामध्ये त्याला काही बोलण्याची वेळ आली तर आम्ही निश्चितच बोलू. पण आमच्या बॉलरनी चांगली बॉलिंग केली आणि त्याच्यासमोर अडचण निर्माण केली तर आम्हाला त्याला काहीच बोलावं लागणार नाही, असं वक्तव्य टीम पेननं केलं.


अशाप्रकारचं क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू अनुकूल असणं महत्त्वाचं आहे. कोहलीसारख्या खेळाडूला आमने-सामनेचा मुकाबला पसंत असेल तर ती त्याची मर्जी आहे. पण हद्द पार करण्याची गरज नसल्याचंही टीम पेन सांगायला विसरला नाही. ज्या खेळाडूंना अशा पद्धतीनं क्रिकेट खेळणं आवडत नाही त्यांनी स्लेजिंगची सुरुवात करु नये, असा सल्ला टीम पेननं दिला.