मुंबई : इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव करुन न्यूझीलंडने जेतेपद पटकावलं. न्यूझीलंडच्या या विजयी कामगिरीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या प्रत्येक खेळाडूने चमकदार कामगिरी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण मैदानाच्या बाहेरच्या न्यूझीलंडच्या खेळाडूने केलेल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपीच्या अंतिम सामन्यात घातलेल्या जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावाचं कारण ऐकल्यावर प्रत्येकाला साऊदीचा अभिमान वाटेल. एका आठ वर्षांच्या कॅन्सरग्रस्त मुलीच्या उपचारासाठी साउदीने पुढाकार घेतला असून यासाठी तो आपल्या जर्सीचा लिलाव करणार आहे. 


या जर्सीवर न्यूझीलंडच्या संघातील संपूर्ण खेळाडूंची स्वाक्षरी आहे .साऊदीने त्याच्या इस्टाग्रामवर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. सोबत जर्सीचा फोटो देखील शेअर केलाय. या पोस्टमध्ये साऊदीने म्हटलंय, 'होली बिट्टी असं कॅन्सरग्रस्त मुलीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी मला बिट्टीच्या आजारपणाविषयी समजले. तेव्हापासूनच मी तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिच्या उपचारासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात घातलेल्या जर्सीचा लिलाव करत आहे. लिलावातून मिळालेले सर्व पैसे बिट्टीच्या कुटुंबीयांना दिले जातील.” बिट्टीवर सध्या स्पेनमध्ये उपचार सुरू आहेत.



अंतिम सामन्यात भारताचा केला पराभव


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 8 विकेटने पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं. या सामन्यात टीम साऊदीने पहिल्या डावात 1 तर दुसऱ्या डावात 4 विकेट घेत न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.