olympic 2020 : वडिलांचं अपुरं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या कुस्तीपटू दीपक पुनियाचा स्वप्नभंग; सेमीफायनलमध्ये पराभव
86 किलो वजनी गटामध्ये त्याला या स्पर्धेत पराभव पचवावा लागला.
olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडूंची दमदार आणि तितकीच लक्षवेधी कामगिरी पाहायला मिळाली. त्यातच बुधवारचा दिवस भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी दिवस ठरला. भारतीय कुस्तीपटूंची कामगिरी पाहता खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा करण्यात आली. पण, अपेक्षांचं ओझं असतानाच कुस्तीपटू दीपक पुनिया याचा मात्र स्वप्नभंग झाला.
सेमी फायनल अर्थात उपांत्य फेरीमध्ये दीपकला अमेरिकेच्या डेव्हिड टेलर याच्याकडून पराभव पत्करावा लागला. 86 किलो वजनी गटामध्ये त्याला या स्पर्धेत पराभव पचवावा लागला. असं असलं तरीही दीपक पुनियाकडे कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. त्यामुळं देशासाठी तो कांस्य पदकाची कमाई करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वडिलांना नाही होता आलेलं पैलवान
बहादुरगड येथील झज्झर येथे राहणाऱ्या दीपकच्या वडिलांना म्हणजेच सुभाष यांना आपल्या मुलाचा भलताच गर्व आहे. कधी एकेकाळी त्यांनीही पैलवान होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण, कुटुंबाची परिस्थिती बेताची नसल्यामुळं त्यांना हे शक्य झालं नाही. आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं असलं तरीही दीपकच्या वडिलांनी हार मानली नाही. आपल्या दोन मुलींच्या जन्मानंतर झालेल्या तिसऱ्या मुलाला त्यांनी फार कमी वयातच कुस्तीच्या आखाड्यात पाठवलं.
नोकरीसाठी आखाड्यामध्ये उतरला होता दीपक
कुस्ती सुरु केली त्यावेळी दीपककडे एक महत्त्वाचं लक्ष्य होतं. ते लक्ष्य म्हणजे नोकरी मिळवण्याचं. 2016 मध्ये भारतीय सैन्यामध्ये त्याला शिपाई या पदावर नोकरी मिळाली. परंतु ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमार यानं दीपकला मोठी ध्येय्य उराशी बाळगण्याची प्रेरणा दिली. ज्यानंतर त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नाही.