Tokyo Olympics | नीरज चोप्राकडून Golden Medel मिल्खा सिंह यांना समर्पित
भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारतासाठी या स्पर्धेचा शेवट गोड आणि गोल्डन करुन दिला.
टोकियो : भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) आजच्या दिवसाची नोंद ही सुवर्ण अक्षरात करण्यात आली आहे. भारताचा या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस होता. भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारतासाठी या स्पर्धेचा शेवट गोड आणि गोल्डन करुन दिला. नीरजने भारताला ट्रॅक अँड फिल्ड (Javelin Throw) मध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकत वैयक्तिक सुवर्ण मिळवून दिलं. दरम्यान नीरजने हे सुवर्ण पदक 'फ्लाईंग सिख' म्हणून ओळखले जाणारे दिवगंत धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांना समर्पित केलंय. मिल्खा सिंह यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. (Tokyo Olympics 2020 Indian javelin thrower Neeraj Chopra Dedicates Gold Medel to flying sikh Milkha Singh)
नीरजची पहिली प्रतिक्रिया...
"मी माझे हे सुवर्ण पदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहित होतं की आज मी माझे सर्वोत्तम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता", अशी पहिली प्रतिक्रिया नीरजने विजयानंतर दिली.
नीरज चोप्रा अॅथेलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. विशेष म्हणजे या फायनलमध्ये नीरजच्या आसपास कोणताही खेळाडू नव्हता. नीरज हा एकमेव खेळाडू होता ज्याचा थ्रो 87 मीटरच्या वर होता. झेक प्रजासत्ताकचा जेकब वैडेलीच 86.67 मीटर आणि विटेस्लाव व्हेसेली 85.44 मीटर अंतरासह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.
मिल्खा सिंह यांना पदक समर्पित करण्याचं कारण काय?
दरम्यान नीरजने मिल्खा सिंह यांनाच का पदक समर्पित केलंय, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. पदक समर्पित करण्यामागचं कारणही तसंच आहे. मिल्खा सिंह यांनी एका कार्यक्रमात एक इच्छा व्यक्त केली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत युवा खेळाडूला अॅथेलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकताना पाहायचंय, असं मिल्खा सिंह यांचं स्वप्न होतं. दुर्देवाने त्यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण झालं नाही. मात्र ते स्वप्न नीरजने आता पूर्ण करुन दाखवलं. त्यामुळे मिल्खा सिंह याचं स्वप्न आता पूर्ण झालंय. या कारणामुळे नीरजने मिल्खा यांना हे पदक समर्पित केलंय.
मिल्खा सिंह काय म्हणाले होते?
"अॅथेलेटिक्समध्ये दमदार कामगिरी करु शकतील असे प्रतिभावान खेळाडू भारतात आहेत. रोम 1960 मध्ये लोकांचं असं मत होतं की जर कोणी 400 मीटर स्पर्धेत जिंकेल तर तो फक्त मिल्खाच. पण दुर्देवाने असं झालं नाही. त्यामुळे माझं असं स्वप्न आहे की युवा खेळाडूला अॅथेलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकताना पाहायचंय", असं मिल्खा सिंह यांनी नमूद केलं होतं.
भारताने पहिल्यांदा एंटवर्प ऑलिम्पिक 1920 साली अॅथेलेटिक्समध्ये भाग घेतला होता. पण तेव्हापासून ते रियो 2016 पर्यंत एकाही खेळाडूला पदक जिंकता आलं नव्हतं. दिग्गज मिल्खा सिंह आणि पीटी उषा याचं क्रमश: 1960 यांचं थोडक्या अंतराने पदक हुकलं होतं.