२०१८ मध्ये भारताच्या या क्रिकेटपटूंनी कमावले सर्वाधिक पैसे
२०१८ या वर्षामध्ये क्रिकेटनं अनेक चढ उतार आणि रेकॉर्ड पाहिले.
मुंबई : २०१८ या वर्षामध्ये क्रिकेटनं अनेक चढ उतार आणि रेकॉर्ड पाहिले. या वर्षामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानात केलेलं बॉल टॅम्परिंग हा वर्षभरातला क्रिकेटमधला सगळ्यात मोठा वाद होता. तर वर्षाच्या शेवटी आयपीएलच्या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्यधीश झाले. तर दिग्गज खेळाडूंवर कोणत्याही टीमनं विकत न घेतल्यामुळे मोठी नामुष्की ओढावली. यावर्षी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सर्वाधिक पैसे मिळाले याची यादी फोर्ब्सनं प्रसिद्ध केली आहे. यातल्या टॉप १० खेळाडूंवर नजर टाकूयात.
१० जसप्रीत बुमराह
२०१८ या वर्षात जसप्रीत बुमराहनं १६.४२ कोटी रुपये कमावले. २०१८ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये बुमराह १०व्या क्रमांकावर आहे. बुमराहची कमाई भारताकडून खेळलल्या मॅचची फी आणि आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळण्याच्या माध्यमातून आलेली आहे.
९ केएल राहुल
या वर्षामध्ये केएल राहुलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमधून त्याला डच्चूही देण्यात आला. असं असलं तरी राहुलची कमाई मात्र वाढली आहे. २०१८ मध्ये राहुलनं १६.४८ कोटी रुपये कमावले. भारताकडून क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट तसंच आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळल्यामुळे आणि वेगवेगळ्या कंपन्यांचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्यामुळे राहुलची कमाई वाढली आहे.
८ सुरेश रैना
सुरेश रैना सध्या भारतीय टीममध्ये नसला तरी तो २०१८ मध्ये सर्वाधिक कमाई असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. यावर्षी सुरेश रैनानं १६.९६ कोटी रुपये कमवले आहेत. यातली सर्वाधिक रक्कम त्याला आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमकडून खेळल्यामुळे मिळाली आहे. तर यातला काही भाग ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्यामुळे मिळालाय.
७ भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमारनं यावर्षी १७.२६ कोटी रुपये कमवले. भुवनेश्वर हा भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये आणि आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळतो. हैदराबादच्या टीमनं यंदाच्या वर्षी त्याला टीममध्ये कायम ठेवलं.
६ आर. अश्विन
आर. अश्विननं यावर्षी १८.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आयपीएलमध्ये अश्विन पंजाबच्या टीमचा कर्णधारही आहे. तर भारताकडून अश्विन फक्त टेस्टमध्येच खेळतो. याचबरोबर काही ब्रॅण्डचा तो ब्रॅण्ड ऍम्बेसेडरही आहे.
५ हार्दिक पांड्या
२०१८ मध्ये हार्दिक पांड्याची कमाई सर्वाधिक म्हणजेच ८०० पटींनी वाढली आहे. यावर्षी पांड्यानं २८.४६ कोटी रुपये कमावले. तर मागच्यावर्षी पांड्याची कमाई ३.०४ कोटी एवढी होती. भारताकडून आणि आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना मिळालेली मॅच फी आणि वेगवेगळ्या ब्रॅण्डचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्यामुळे त्यानं एवढे पैसे कमावले.
४ रोहित शर्मा
रोहित शर्मानं २०१८ मध्ये ३१.४९ कोटी रुपये कमावले. यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. भारताकडून आणि आयपीएलमध्ये खेळताना आणि ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्यामुळे रोहितनं एवढी कमाई केली.
३ सचिन तेंडुलकर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही सचिन तेंडुलकर यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी सचिननं ८० कोटी रुपये कमावले.
२ एमएस धोनी
एमएस धोनीनं यावर्षी १०१.७७ कोटी रुपये कमावले. भारताकडून आणि आयपीएलमध्ये खेळताना मिळालेली मॅच फी आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्यामुळे धोनीनं इतकी कमाई केली.
१ विराट कोहली
फोर्ब्सच्या यादीनुसार भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली हा २०१८ मधला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीनं यावर्षी २२८.०९ कोटी रुपये कमाई केली आहे. भारताकडून आणि आयपीएलमध्ये खेळताना, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्यामुळे आणि इन्स्टाग्राम पोस्टमुळे विराट सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे.