मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डामधला वाद अजूनही सुरुच आहे. मानधनावरून सुरु झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पाच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या अ संघाकडून फुकट खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, अॅश्टन ऍगर, जॅक्सन बर्ड आणि ट्रॅव्हिस हेड यांना पुढच्या महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अ संघाकडून फुकट खेळावं लागू शकतं.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, बांग्लादेश दौरा आणि अॅशेस सीरिजसाठी ट्रॅव्हिस हेडला नेतृत्वाची धुरा दिली जाऊ शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ऑस्ट्रेलियाच्या अ संघाकडून खेळण्यासाठी मी उत्सुक असल्याचं हेडनं सांगितलं आहे.  


क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मात्र या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ऑस्ट्रेलिया अ संघासाठीच्या करारावर अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं म्हणणं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी करार झाला नाही तर ऑस्ट्रेलियान खेळाडूंचा इतर देशांमध्ये होणाऱ्या टी-20 लीगमधल्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. ऑस्ट्रेलियन बोर्ड अशा पद्धतीनं खेळाडूंना दुसऱ्या देशांमधल्या टी-20 लीगमध्ये खेळण्यापासून अडवू शकत नाही, असं शेन वॉटसन म्हणाला आहे.