IPL 2020: पहिल्या सामन्यात राजस्थानचे हे २ दिग्गज खेळाडू नसण्याची शक्यता
राजस्थानचे २ दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता
दुबई : आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात उद्या टक्कर होणार आहे. चेन्नई संघाने या स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे, तर राजस्थान या हंगामात आपला पहिला सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत राजस्थानवर दबाव असेल आणि या दरम्यान संघाला दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दौर्यावर मँचेस्टर येथे सुरू असलेल्या नेट प्रॅक्टिस दरम्यान राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला दुखापत झाली. यामुळे स्मिथला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भाग घेता आला नाही आणि आता स्मिथ राजस्थानच्या आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यातही खेळणार का याबाबत शंका आहे.
जोस बटलर आपल्या कुटुंबासमवेत दुबईला आला आहे आणि सध्या तो क्वारंटाईन आहे. तो म्हणाला आहे, 'दुर्दैवाने राजस्थान रॉयल्ससाठी मी पहिला सामना खेळू शकणार नाही कारण मी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतोय. याची आवश्यकता होती कारण मी येथे माझ्या कुटुंबासोबत आहे.'
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका 16 सप्टेंबर रोजी संपली त्यानंतर दोन्ही देशांचे एकूण 21 खेळाडू आयपीएलसाठी युएईला आले आहेत.
हे खेळाडू इंग्लंडच्या चार्टर्ड एअरक्राफ्टमधून आले होते, त्यामुळे बीसीसीआयने त्यांचा क्वारंटाईन कालावधी सहा दिवसांऐवजी 36 तासात बदलला. त्याच वेळी, बटलर आपल्या कुटुंबासमवेत वेगळ्या विमानात येथे दाखल झाला, ज्यामुळे त्यांना सहा दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
न्यूझीलंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स आधीच टीममध्ये नाही. तो टीममध्ये कधी परतेल याबाबत कोणतीही माहिती नाही.