पाकिस्तानच्या उमर अकमलचा नकोसा विक्रम, रोहित शर्माच्या ४ पावलं पुढे
पाकिस्तानचा खेळाडू उमर अकमलने नकोशा विक्रमाला गवसणी घातली आहे.
लाहोर : पाकिस्तानचा खेळाडू उमर अकमलने नकोशा विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये उमर अकमलला एकही रन करता आली नाही. या मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यांना सीरिजही गमवावी लागली. या मॅचमध्ये उमर अकमलने टी-२० मॅचमध्ये सर्वाधिकवेळा शून्यवेळा आऊट होण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेने दिलेल्या १८३ रनच्या आव्हानाचा पाठलाग करत होती, तेव्हा उमर अकमल खातंही न उघडता माघारी परतला. ८४व्या आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये उमर अकमल १०व्यांदा शून्यवर आऊट झाला. पहिल्या टी-२०मध्येही अकमल शून्य रनवरच आऊट झाला होता.
अकमलसोबतच श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशानही सर्वाधिक १० वेळा शून्य रनवर आऊट झाला आहे. दिलशान ८० मॅचमध्ये १० वेळा शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्या ल्युक राईटचा क्रमांक लागतो. ल्युक राईट ९वेळा शून्यवर आऊट झाला. तर रोहित शर्मा ९८ मॅचमध्ये ६ वेळा खातं न उघडता आऊट झाला.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा १४७ रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या मॅचमध्येही श्रीलंकेचा ६४ रननी विजय झाला होता. ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये आता श्रीलंकेने २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. सीरिजची शेवटची मॅच गुरुवारी याच मैदानात होणार आहे.