Urvil Patel : गुजरात टायटन्सने संघातून काढलं, पठ्ठ्यानं दुसऱ्याच दिवशी शतक ठोकलं; सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक!
Urvil Patel smashes hundred : कोणाच्या मनीध्यानी नसणाऱ्या उर्विल पटेल (Urvil Patel) या गुजरात टायटन्सच्या पठ्ठ्यानं आज सर्वांना `जोर का झटका` दिला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) खणखणीत शतक ठोकून सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडीस काढला आहे.
Gujarat Titans released Urvil Patel : आयपीएलच्या (IPL 2024) पुढील हंगामातील लिलावापूर्वी, सर्व फ्रँचायझींनी काही खेळाडूंना कायम ठेवलंय तर काहींना घरचा रस्ता दाखवला आहे. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पांड्याला ट्रेड आणि इतर 8 खेळाडूंना रिलीज केलं आहे. गुजरातने रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही आश्चर्यकारक नावं आहेत. त्यामध्ये यश दयाल पासून शिवाम मावीचा नंबर लागतो. मात्र, कोणाच्या मनीध्यानी नसणाऱ्या उर्विल पटेल (Urvil Patel) या गुजरात टायटन्सच्या पठ्ठ्यानं आज सर्वांना 'जोर का झटका' दिला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) खणखणीत शतक ठोकून उर्विल पटेल याने गुजरात टायटन्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चंदीगड येथे सोमवारी खेळल्या गेलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या गट डच्या सामन्यात गुजरातने अरुणाचल प्रदेशचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अरुणाचल प्रदेशचा संघ 35.1 ओव्हरमध्ये केवळ 159 धावा केल्या आणि संघ ऑलआऊट झाला. पियुष चावला आणि जयवीर परमार यांनी 3-3 बळी खिशात घातले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने अवघ्या 13 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठलं. या सामन्यात हिरो ठरला तो उर्विल पटेल. यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेलने 41 चेंडूत नाबाद शतक झळकावलं. चंदीगडच्या महाजन क्रिकेट अकादमी मैदानावर जणू काही वादळच आलं होतं, अशी खेळी उर्विलने केली आहे.
उर्विल पटेलने 41 चेंडूत नाबाद शतक झळकावून विजय निश्चित केला. या खेळीत त्याने 9 फोर अन् 7 गगनचुंबी सिक्स मारले. या आक्रमक खेळीबरोबरच उर्विल लिस्ट ए मध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी 2010 मध्ये युसूफ पठाणने महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात बडोद्यासाठी 40 चेंडूत शतक झळकावलं होतं. तर सध्याच्या टीम इंडियाचा टी-ट्वेंटी कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 42 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता उर्विलने सूर्याचा रेकॉर्ड मोडून आयपीएल ऑक्शनसाठी मजबूत दावेदारी ठोकली आहे.
गुजरात टायटन्स
सोडलेले खेळाडू : अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, केएस भरत, ओडियन स्मिथ, प्रदीप सांगवान, शिवम मावी, उर्विल पटेल, यश दयाल.
कायम ठेवलेले खेळाडू : अभिनव सदारंगनी, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा.