नाओमी ओसाकानं पटकावलं US Open 2020 चं जेतेपद
अझरेंकाचं स्वप्न भंगलं....
नवी दिल्ली : सलग तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा US Open या स्पर्धेचं विजेतेपद पटकावत जपानच्या नाओमी ओसाका हिनं Victoria Azarenka व्हिक्टोरिया अझरेंका हिचा स्वप्नभंग केला. हे तिचं तिसरं ग्रँडस्लॅम सलविजेतेपद ठरलं. ज्यामध्ये अमेरिकन ओपनवर तिनं दुसऱ्यांदा आपलं अधिपत्य सिद्ध केलं.
Naomi Osaka नाओमी ओसाका हिनं या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तिच्यावर १-६, ६-३, ६-३ अशी मात केली. २०१८ मध्ये तिनं सेरेना विलियम्सवर मात करत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. सेरेना विलियम्सवर मात करुन पुढं आलेल्या व्हिक्टोरिया अझरेंका हिनं अंतिम फेरीत अतिशय ताकदीनं सुरुवात केली. १-६ अशा फरकानं तिनं पहिला सेट जिंकलासुद्धा. दुसऱ्या सेटपर्यंत तिच्याकडे ३-० अशी आघाडी होती. पण, पुढे ओसाकाने अंतिम फेरीवर पकड मिळवण्यासाठीच्या हालचाली सुरु केल्या. सलग सहा गेमपॉईंट जिंकत तिनं दुसरा सेट खिशात टाकला. व्हिक्टोरियाला अंतिम फेरीमध्ये चिवट झुंज देत ओसाकानं अखेर तिच्यावर मात केली.
व्हिक्टोरियाला अमेरिकन ओपन या स्पर्धेच्या जेतेपदानं तिसऱ्यांदा हुलतावणी दिली. यापूर्वी तिला २०१२ आणि २०१३ या वर्षांमध्येही उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. असं असलं तरीही मागील सात वर्षांमध्ये एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या बेलारुसच्या ३१ वर्षी अझरेंकानं अनेक क्रीडारसिकांची मनं जिंकली.
दरम्यान, अतिशय महत्त्वाच्या अशा या स्पर्धेवरही कोरोनाचं सावट पाहायला मिळालं. ज्यामध्ये पावलोपावली सुरक्षित अंतर, स्वच्छता असे निकष पाळले जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. इतकंच नव्हे तर, खेळाडूंना त्यांचं चषक हे स्वत:च्याच हातांनी उचलून घ्यायचं होतं. ते त्यांना कोणाच्याही हस्ते प्रदान करण्यात आलं नाही.