Usman Khawaja On Keshav Maharaj Om Symbol Bat:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने म्हणजेच आयसीसीने ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाची विनंती फेटाळली आहे. गाझामधील मानवी संकटासंदर्भात जागृती करण्यासाठी उस्मान ख्वाजाने आयसीसीकडे विनंती केली होती. ख्वाजाने त्याच्या बॅटवर तसेच बुटांवर शांततेचं प्रतिक असलेलं कबुतर आणि ऑलिव्ह झाडाच्या फांद्यांचं स्टीकर लावून देण्याची विनंती केली होती. पाकिस्तानविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीमध्ये आपल्याला ही परवानगी द्यावी अशी मागणी ख्वाजाने केली होती. मात्र ही परवानगी नाकारल्यानंतर ख्वाजाने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत क्रिकेटचं नियमन करणाऱ्या या संघटनेची दुतोंडी भूमिका असल्याची घणाघाती टीका केली आहे.


आधी बूट आणि बॅटवर बंदी अन् नंतर कारवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्वाजाला काही आठवड्यांपू्र्वीच क्रिकेटच्या मैदानामध्ये 'All Lives Are Equal' आणि 'Freedom Is A Human Right' ही वाक्य लिहिलेले बूट घालण्यापासून रोखण्यात आलं होतं. पाकिस्तानविरुद्ध पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान हा प्रकार घडला. याचा निषेध करण्यासाठी ख्वाजाने दंडाला काळी पट्टी बांधून सामना खेळला. मात्र यावरही आक्षेप घेत आयसीसीने ख्वाजाला दंड ठोठावला. मात्र नंतर ख्वाजाने आपण काळी पट्टी खासगी निर्णयामुळे बांधल्याचं सांगितलं. तसेच दंड ठोठवण्याच्या निर्णयाला आपण आव्हान तर देणार आहोतच शिवाय मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या सामन्यातही दंडावर काळी पट्टी बांधून उतरु शकतो असा इशाराच ख्वाजाने दिला आहे.


सोशल मीडियावरुन झापलं


लेखी मजकुराऐवजी आपल्याला कबुतर आणि ऑलिव्हची पानं दाखवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ख्वाजाने केली होती. रविवारी मेलबर्नमध्ये सरावादरम्यान त्याच्या बॅटवर आणि बुटांवर ही दोन्ही चिन्हं दिसून आली. मात्र अशा गोष्टी मुख्य सामन्यात वापरता येणार नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. आयसीसीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना ख्वाजाने ही दुटप्पी भूमिका असून नियम पाळण्यासंदर्भात सातत्य नाही अशी टीका केली आहे. ख्वाजाने केन वेस्टच्या 'कांट टेल मी नथिंग'चं गाणं बॅकग्राऊण्डला ठेवत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना ख्वाजाने, "सर्वांना मेरी ख्रिसमस. काही वेळेस तुम्ही हसायचं सोडून काहीच करु शकत नाही. बॉक्सिंग डेला भेटूयाच," असं म्हटलं आहे. त्याने या पोस्टमध्ये #inconsistent #doublestandards हे हे हॅशटगही वापरलेत. 


केशव महाराजच्या ॐ वरही घेतला आक्षेप


ख्वाजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या संघाचा सहकारी मार्नस लबूशेनच्या बॅटचा फोटो आहे. त्याच्या बॅटवर घार आणि बायबलमधील ओळी असल्याचं दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराजचा फोटोही या व्हिडीओत आहे. या फोटोमध्ये केशवच्या बॅटवर हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जाणारं ॐ (ओम) हे चिन्ह दिसत आहे. 



ऑस्ट्रेलियन संघाचा ख्वाजाला पाठिंबा


सोमवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने एमसीजेवरील सामन्याआधीच ख्वाजीचा बाजू घेतली आहे. ख्वाजाचं ते खासगी मत असून तो मेसेज एवढा आक्षेपार्ह नव्हता, असं कमिन्सने म्हटलं आहे. "ख्वाजाच्या अर्जाबद्दलची सविस्तर माहिती मला नाही. मात्र कबुतर आणि ओलिव्हचं चिन्हात काही आक्षेप नाही. आमचा ख्वाजाला पाठिंबा आहे. मला वाटतं की त्याची जी भूमिका आहे त्यावर तो ठाम आहे. तो फार सन्मानपूर्वक पद्धतीने हे करतोय. प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे. हे काही फार वादग्रस्त विधान नाही. मी कबुतराच्या चिन्हाबद्दलही हेच म्हणेल. त्याने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं आहे त्याचा त्याला अभिमान वाटायला हवा. मात्र काही नियम ठरलेले असतात. त्यामुळेच आयसीसीने नकार कळवला असेल. त्यांनी नियम तयार केलेत आणि तुम्हाला ते मान्य करावे लागतील," असं कमिन्स म्हणाला.