अजिंक्यची सोशल मीडियावर `वडापाव पे चर्चा`, सचिनचीही उडी
तुम्हाला वडापाव कशाबरोबर खायला आवडतो?
मुंबई : माहौल वीकेंडचा आहे. त्यात थंडीही छान पडलीय. काही चमचमीत खायचा मूड असेल तर वडापावचा ऑप्शन चांगला आहे. कारण सध्या वडापाव पे चर्चा सुरू झालीय. वडापाव... भुकेला वडापाव... टाईमपासला वडापाव... पावसातला गरम गरम वडापाव... मुंबईकरांच्या डीएनएतच वडापाव आहे... तो असा मिरचीसकट समोर आला की भल्याभल्यांचं डाएट तेल लावत जातं... असा हा चमचमीत अस्सल मुंबईकर भिडू... त्याची नव्यानं चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे क्रिकेटपटू अजिंक्य राहणेनं ट्विटरवर टाकलेली पोस्ट...
अजिंक्य रहाणेनं ट्विटरवर एक प्रश्न विचारला... 'तुम्हाला वडापाव कशाबरोबर खायला आवडतो? चहाबरोबर वडापाव? चटणीबरोबर वडापाव? की नुसताच वडापाव?'
राहणेची वडापावची पोस्ट पाहताच पहिली उडी पडली ती सचिन तेंडुलकरची... सचिन म्हणतो, 'मला वडापाव लाल चटणीबरोबर खायला आवडतो पण त्याबरोबरच थोडीशी हिरवी चटणी आणि चवीला चिंचेची चटणी असेल तर एकदम भन्नाट कॉम्बिनेशन...'
सचिन आणि वडपावचं एक स्पेशल नातं आहे. सचिन शिवाजी पार्कवर आचरेकर सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवायचा. आचरेकर सर सचिनकडून एवढी प्रँक्टिस करुन घ्यायचे की सचिन दमून जायचा. बँग पँक केली की सचिन आणि विनोदचा मोर्चा वळायचा तो जिमखान्याबाहेरच्या वडापाव वाल्याकडे... दोघेही दाबून वडापाव खायचे... क्रिकेटचा देव घडवण्यात वडापावचाही मोठा वाटा आहे.