लखनऊ : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांवर मारहाणीचे प्रकार समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील रस्त्यावर ड्राय फ्रुट विकणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. हे दोन्ही तरुण काश्मिरचे आहेत. या तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मारहाणीच्या या व्हिडिओवर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर चांगलाच भडकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोकं या ड्रायफुट विकणाऱ्या तरुणांना मारहाण करत असल्याचे दिसतं आहे. या व्हिडिओत एक जण 'त्यांना का मारत आहेत' अशी विचारणा करत आहे. त्यावर त्याला सांगण्यात आलं की, 'हे दोन्ही ड्रायफ्रुट विक्रेते काश्मिरी तरुण आहेत. हे आपल्या सैन्यावर तिथे दगडफेक करतात.' या दरम्यान काही जणांनी त्या दोन्ही काश्मिरी तरुणांकडे त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली. या काही विकृत लोकांनी तरुणांची अमानुषपणे मारहाण केली. पण सुदैवाने तेथील पादचाऱ्यांनी मध्यस्थी करुन त्यांना वाचवले.



गौतम गंभीरने यासर्व प्रकरणी ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना फार अपमानास्पद आहे. काश्मीर मधील व्यापारांना दिवसाढवळ्या आपल्या देशातच मारहाण होते, ही घटना फार अपमानजनक आहे. भारतावर जेवढा आपला हक्क आहे तेवढाच त्यांचा देखील आहे. आपण कोणत्या राष्ट्रवादाची मूळ पेरत आहत? असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला आहे.



या मारहाणी प्रकरणी अभिनेत्री रिचा चढ्ढाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत म्हटले आहे की 'या काश्मिरी तरुणांना मारहाण करणाऱ्या अतीउत्साही लोकांवर कारवाई करायला हवी. यांना अटक झाल्याचे वृत्त मला समजले. मला आनंद झाला. कचरा ज्या प्रकारे केराच्या टोपलीत टाकतो, त्याच प्रकारे या निरुपयोगी लोकांना कारागृहात डांबायला हवे. हीच त्यांच्यासाठी योग्य जागा आहे.'


यासंपूर्ण प्रकरणी लखनऊ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. बजरंग सोनकर असे या आरोपीचे नाव आहे. 'हे लोकं काश्मिरी असून काश्मीरमध्ये आपल्या सुरक्षादलांवर दगडफेक करतात. असे खोटे सांगून या आरोपींनी त्या काश्मिरी व्यापाऱ्यांवर हल्ला चढवला', अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. काश्मिरी तरुणांना मारहाण केल्याची ही काही पहिली वेळ नाही. महाराष्ट्रातील यवतमाळ मध्ये काही दिवसांपूर्वी काही टवाळ युवासैनिकांनी काश्मिरी तरुणांना बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांना घोषणा द्यायला लावल्या होत्या. या सर्व प्रकारानंतर आदित्य ठाकरेंनी या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली होती.