VIDEO: कार्तिकचा हा जबरदस्त कॅच बघितला का?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी दारुण पराभव झाला.
वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी दारुण पराभव झाला. रनच्या हिशोबानं भारताचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय भारताच्या चांगलाच अंगाशी आला. न्यूझीलंडनं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २१९ रन केले. न्यूझीलंडचे बॅट्समन या मॅचमध्ये आक्रमक खेळी करत असतानाच दिनेश कार्तिकच्या कॅचनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. न्यूझीलंडच्या इनिंगच्या १५व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकनं बाऊंड्रीवर डॅरिल मिचेलचा शानदार कॅच पकडला.
डॅरिल मिचेलनं मारलेला बॉल सीमारेषेबाहेर जात होता. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या कार्तिकनं कॅच पकडला. कॅच पकडत असताना दिनेश कार्तिक सीमारेषेबाहेर जात होता. त्यावेळी कार्तिकनं बॉल हवेत उडवला. यानंतर सीमारेषे बाहेरून कार्तिक पुन्हा आतमध्ये आला आणि त्यानं पुन्हा कॅच पकडला.
दिनेश कार्तिकच्या या कॅचचं कौतुक होत असलं तरी या मॅचमध्ये त्यानं दोन कॅच सोडले. १८व्या ओव्हरमध्ये डीप मिडविकेटवर फिल्डिंग करत असताना कार्तिकनं रॉस टेलरचा कॅच सोडला. त्यावेळी टेलर १९ रनवर खेळत होता. ३४ रन करून टेलर आऊट झाला. ११व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कार्तिकनं टीम सायफर्टचाही कॅश सोडला. त्यावेळी सायफर्ट ७१ रनवर खेळत होता.
टीम सायफर्टनं ४३ बॉलमध्ये ८४ रनची विस्फोटक खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. टीम सायफर्टचा टी-२० क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी टी-२० क्रिकेटमधला त्याचा सर्वाधिक स्कोअर १४ रन होता. टीम सायफर्ट आणि कॉलीन मुन्रो या न्यूझीलंडच्या ओपनरनी त्यांचा आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी ८.२ ओव्हरमध्येच ८६ रन केले.
टीम सायफर्टला धोनीनंही एक जीवनदान दिलं. कृणाल पांड्याच्या बॉलिंगवर महेंद्रसिंग धोनीनं सायफर्टचा कॅच सोडला. अखेर कृणाल पांड्यानंच मुन्रोची विकेट घेऊन ही भागीदारी तोडली. मुन्रोची विकेट गेल्यानंतरही सायफर्टनं त्याचा आक्रमक खेळ सुरुच ठेवला. पण खलील अहमदनं सायफर्टची विकेट घेतली. खलीलीनं ८४ रनवर सायफर्टला बोल्ड केलं.