मुंबई : क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये १० विकेट घेण्याचं स्वप्न प्रत्येक बॉलर पाहतो. हेच स्वप्न अंडर-१९ कूच बिहार ट्रॉफीमध्ये मणीपूरच्या रेक्स राजकुमार सिंगनं पूर्ण केलं आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतपूरमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये रेक्स सिंगनं हे रेकॉर्ड केलं आहे. रेक्स सिंगनं अरुणाचल प्रदेशच्या एका इनिंगमधल्या सगळ्या १० विकेट घेतल्या. रेक्स सिंगच्या बॉलिंगचा एक व्हिडिओ बीसीसीआयनं ट्विटरवरून शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून हे रेकॉर्ड पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये अनिल कुंबळेनं केलं होतं. पण तरी रेक्स सिंगची तुलना कुंबळेबरोबर नाही तर इरफान पठाणसोबत होत आहे. रेक्स सिंगची बॉलिंगची शैली आणि स्विंग इरफान पठाणसारखा असल्याचं मत यूजर्सनी व्यक्त केलं आहे.


रेक्स सिंगनं अरुणाचल प्रदेशविरुद्ध ९.५ ओव्हरमध्ये ११ रन देऊन १० विकेट घेतल्या. यातल्या ६ ओव्हर मेडन होत्या. रेक्स सिंगनं ५ खेळाडूंना बोल्ड, दोन खेळाडूंना एलबीडब्ल्यू केलं. तर त्याच्या बॉलिंगवर तीन खेळाडू कॅच आऊट झाले. रेक्स सिंग तीन वेळा हॅट्रिक मिळण्यापासून चुकला. या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रेक्स सिंगनं केलेल्या या बॉलिंगमुळे अरुणाचल प्रदेशची टीम ३६ रनवर आऊट झाली. मणीपूरला मॅच जिंकण्यासाठी ५३ रनचं आव्हान मिळालं. मणीपूरनं हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. अरुणाचल प्रदेशनं पहिल्या इनिंगमध्ये १३८ रन केले होते. यातल्या ५ विकेट रेक्स सिंगनं घेतल्या होत्या. मणीपूरची पहिली इनिंग १२२ रनवर संपुष्टात आली होती.



अनिल कुंबळे-जिम लेकरचं रेकॉर्ड


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकरनं एका इनिंगमध्ये १० विकेट घेण्याचं रेकॉर्ड केलं आहे. अनिल कुंबळेनं पाकिस्तानविरुद्ध दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात एका इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या होत्या. याचवर्षी नोव्हेंबरमध्ये सीके नायडू ट्रॉफी (अंडर-२३) मध्ये पुडुचेरीचा स्पिनर सिदाक सिंगनं एका इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या होत्या. ती मॅच मणीपूरविरुद्धच होती.