वेस्ट इंडिजचा खेळाडू रहकीम कॉर्नवॉलला (Rahkeem Cornwall) हा क्रिकेटपेक्षा आपल्या वजनामुळे जास्त चर्चेत असतो. 'जगातील सर्वात वजनदार खेळाडू' म्हणून ओळख असलेला रहकीम कॉर्नवॉल हा अनेकदा खिल्लीचाही विषय ठरतो. दरम्यान आपल्या याच वजनामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत असून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रहकीम कॉर्नवॉल रन आऊट झाला आहे. आता रन आऊट होणं यात इतकं काय अप्रूप असा विचार करत असाल तर मग व्हिडीओ पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहकीम कॉर्नवॉल हा सध्या सीपीएलमध्ये (Caribbean Premier League 2023) खेळत आहे. बार्बाडॉस रॉयल्स संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉल या सामन्यात शून्यावर बाद झाला. पहिल्याच चेंडूवर धाव घेण्याच्या नादात रहकीम कॉर्नवॉलला आपली विकेट गमवावी लागली. संघासमोर 200 धावांचं आव्हान असल्याने रहकीम कॉर्नवॉलला आपण वेगाने धावा करण्याची गरज आहे याची कल्पना होती. पण या प्रयत्नात तो बाद झाला आणि सोबतच ट्रोलही होण्याची वेळ आली. 


याचं कारण रहकीम कॉर्नवॉलने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू खेळाडूच्या हातात गेला. यादरम्यान चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण रहकीम कॉर्नवॉल इतक्या धीम्या गतीने धावत होता की रन आऊट झाला. रहकीम कॉर्नवॉल धावत जरी गेला असता तरी नाबाद राहिला असता. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यानंतर पुन्हा एकदा वजनावरुन त्याला ट्रोल केलं जात आहे. 



रहकीम कॉर्नवॉल वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू असून आपल्या वजनामुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. अनेक क्रिकेट पंडित, माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी रहकीम कॉर्नवॉलला त्याचं वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र योग्य डाएट करुनही त्याचं वजन मात्र नियंत्रित होत नाही आहे. 


"मी माझ्या शरीराची रचना बदलू शकत नाही. मी खूप उंच किंवा खूप मोठा आहे असे मी म्हणू शकत नाही. प्रत्येकजण लहान किंवा सडपातळ होणार नाही. मी फक्त मैदानात जाऊन माझा खेळं दाखवणं इतकंच करु शकतो," असं रहकीम कॉर्नवॉलने म्हटलं आहे. 


"मी फार वजनदार खेळाडू आहे यात काही शंका नाही. पण मला मेहनत घ्यावी लागणार आहे. मी याबाबत फार आळशी नाही.. मी फिटनेसवर फार वेळ घालवतो. तसंच नीट खाण्याचा प्रयत्न करतो," असंही त्याने सांगितलं. 


दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं झाल्या, सीनियर लुसिया किंग्जने बार्बाडोस रॉयल्सचा पराभव केला. कॉर्नवॉलचा संघ 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 147 धावाच करू शकला.