टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू यासिर शाह ट्रोल
टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासिर शाहला ट्रोल करण्यात येत आहे.
दुबई : टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासिर शाहला ट्रोल करण्यात येत आहे. एका भारतीय चाहतीसोबत टिकटॉक व्हिडिओ केल्यानंतर ट्रोल झालेल्या यासिर शाहला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही झापलं आहे. या व्हिडिओमध्ये यासिर शाह एका महिलेबरोबर बॉलीवूडचं गाणं गुणगुणताना दिसत आहे.
पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाहने दुबईतल्या एका पार्टीमध्ये महिलेसोबत एक बॉलीवूड गाणं म्हणलं. या पार्टीमध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलही सहभागी झाला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बॉलीवूडच्या गाण्यावर व्हिडिओ बनवल्यामुळे यासिर शाहला समज दिली आहे. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनीही यासिर शाहने चूक केल्याचं मान्य केलं आहे. सोशल मीडियासाठी अशाप्रकारचा व्हिडिओ रेकॉर्ड करणं योग्य नव्हतं, असं मिकी आर्थर म्हणाले.
याप्रकरणी यासिर शाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्पष्टीकरण दिल्याचं समजत आहे. 'मी दुबईच्या मॉलमध्ये असताना एक महिला चाहती माझ्याजवळ आली आणि तिने टिकटॉक व्हिडिओ बनवण्याची विनंती केली. तिच्या या विनंतीचा मान ठेवत मी टिकटॉक व्हिडिओ बनवला,' असं यासिर शाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितलं.
काही दिवसांमध्येच यासिर शाहचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. पाकिस्तानची टीम ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी युएईमध्ये होती. या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा ५-०ने पराभव झाला. या दारुण पराभवानंतर काढलेला टिकटॉकच्या व्हिडिओमुळे पाकिस्तानचे चाहते आणखी भडकले. हा वाद वाढल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासिर शाहला समज दिली. खेळाडूंनी सोशल मीडियाच्या प्रभावाला गंभीरतेनं घेत नाहीयेत. यासिरने केलेलं कृत्य हे याचं उदाहरण आहे, असं पीसीबीचा एक अधिकारी म्हणाला.