कोलकाता : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३४ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये कोलकात्याने मुंबईला विजयासाठी २३३ रनचं आव्हान दिलं होतं. या पराभवाबरोबरच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला आहे. आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना रोहित शर्माने स्टम्पवर बॅट मारली. यामुळे रोहितच्या मानधनातली १५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडन गार्डनला झालेल्या या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. कोलकात्याच्या क्रिस लिन आणि शुभमन गिल यांनी ९६ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. तर मुंबईची सुरुवात फारच खराब झाली. क्विंटन डि कॉक दुसऱ्याच ओव्हरला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा एलबीडब्ल्यू झाला. डीआरएस घेतल्यानंतरही रोहितला आऊट देण्यात आलं. मग निराश झालेल्या रोहितने नॉन स्ट्रायकर एन्डवरच्या स्टम्पवर बॅट मारली.



रोहित चौथ्या ओव्हरमध्ये १२ रनवर खेळत होता. हॅरी गरनीने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रोहितला चकवा दिला आणि बॉल त्याच्या पॅडला जाऊन लागला. अंपायरने रोहितला आऊट दिलं. डीआरएसही रोहित शर्माची मदत करू शकला नाही. यामुळे नाराज झालेल्या रोहितने स्टम्पवर बॅट मारली.


मुंबईविरुद्धच्या मॅचमधल्या विजयामुळे कोलकात्याचं प्ले ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न अजूनही कायम आहे. तर मुंबईला अजूनही प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मॅच जिंकावी लागेल. उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभव झाला तर मुंबईचं प्ले ऑफमध्ये जायचं स्वप्न नेट रन रेटवर अवलंबून असेल.